राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर

राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोद्धेत जाऊन राम जन्मभूमीचे दर्शन घेण्याची घोषणा केली आहे. शिवसेना हिंदुत्वापासून झपाट्याने दूर होत असताना राज ठाकरे यांची अयोद्ध्या भेट महाराष्ट्रातील बदलणा-या राजकारणाची नांदी मानली जात आहे.
गेल्या काही वर्षात राज ठाकरे यांनी मनसेचे अस्तित्व वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावरून भाजपाच्या विरोधात प्रचाराचा धुऱळा उडवला होता. परंतु प्रत्यक्षात मनसेला याचा फारसा फायदा झाला नाही. विधानसभा निवडणुकीत जागा वाटप करताना आणि पुढे महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर राज ठाकरे यांना खड्यासारखे दूर ठेवण्यात आले. लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींवर तुफान टीका करणारे राज ठाकरे गेल्या काही दिवसात मोदींच्या विरोधात एक शब्दही बोललेले नाहीत. भाजपावर त्यांनी कोणतीही टीका केलेली नाही.
राज्यात एकाकी पडलेल्या राज ठाकरे यांनी वेगळा विचार सुरू केल्याचे संकेत गेल्या काही महिन्यात मिळाले. राज ठाकरे यांची पक्षाचा झेंडा बदलून शिवमुद्रा असलेला झेंडा स्वीकारल्यानंतर ते पुन्हा हिंदुत्वाकडे वळल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या अयोद्ध्या भेटीच्या घोषणेमुळे त्या चर्चेवर नव्याने शिक्कामोर्तब होत आहे.
शिवसेनेने काँग्रेस सोबत सत्तेवर आल्यापासून हिंदुत्वाच्या राजकारणापासून काडीमोड घेतल्याचे चित्र आहे. शिवसेनाप्रमुखांनी आय़ुष्यभर मिरवलेले हिंदुहृदय सम्राट हे बिरुद वगळण्यापासून ते टीपू जयंती साजरी करण्यापर्यंत घेतलेल्या अनेक निर्णयामुळे शिवसेनेचा कडवा हिंदुत्ववादी मतदार प्रचंड नाराज आहे. शिवसेनाप्रमुखांसोबत सोनिया गांधींचे पोस्टर पाहणे त्याला मंजूर नाही. राज ठाकरे यांच्या बदललेल्या धोरणांमुळे हा मतदार त्यांच्या जवळ येण्याची शक्यता आहे. मनसेच्या नव्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे भाजपाच्या जवळ येण्याची शक्यता आहे. आगामी काळात राज्यातील अनेक महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका असून या निवडणुकीत मनसे भाजपामध्ये युती होण्याची शक्यता नसली तरी काही ठिकाणी अंडरस्टॅंडींग होण्याची शक्यता आहे.
Exit mobile version