केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की. @PMOIndia
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2021
१०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.
हे ही वाचा:
मुंबईत सॅनिटाझर यंत्रणा बसविण्यासाठी जनहित याचिका दाखल
रामायण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
ठाण्यातील जम्बो कोविड सेंटर वापराविना
राज्य सरकारचा प्रताप! मुंबईत तीन लाख किलो डाळ सडून वाया
राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं होत. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यात लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच कोविड रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, असे राज ठाकरेंनी नमूद केले होते.