नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

राज ठाकरेंनी शिवतीर्थावर केली घोषणा

नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलेले असताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. शिवाय, यावेळी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेशही त्यांनी मनसैनिकांना दिले.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या या मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंनी भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. त्याचा तपशील राज ठाकरे जाहीर करणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. शेवटी त्या भेटीतून महायुतीला राज ठाकरे यांनी काय निश्चित केले हे अखेर स्पष्ट झाले.

राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी स्पष्ट केले की, मला राज्यसभा नको, विधान परिषद नको, पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. मला स्वतःला काही अपेक्षा नाही. वाटाघाटीत मला पाडू नका. त्यामुळे मी भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केले की, आता विधानसभेच्या तयारीला तुम्ही लागा. पुढच्या गोष्टी पुढे. मी तुम्हाला भेटायला येत आहे. जे मांडायचे आहे ते मांडेन.

हे ही वाचा:

‘मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही जमीन काबीज करू शकला नाही’

ईडीने सादर केलेल्या पुराव्यांनुसार अरविंद केजरीवालांची अटक योग्यच

‘काँग्रेसच्या मनात विष, राम नावाचा तिरस्कार करते इंडी आघाडी’!

हमास हल्ल्यातील पीडीतेने केले मोदींचे कौतुक

राज ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट झाले. पण विधानसभेसाठी ते महायुतीत असतील याची ग्वाहीदेखील या भाषणातून दिली. राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात करताना ज्या वावड्या त्यांच्या आणि अमित शहा यांच्या भेटीसंदर्भात उडविल्या गेल्या त्याचा समाचार घेतला. मी शिवसेनेचा प्रमुख होणार अशाही अफवा पसरविल्या गेल्या, असे म्हणत राज ठाकरेंनी सांगितले की, मला जर व्हायचे असते तर तेव्हाच झालो असतो. पण मी स्वतःचा पक्ष काढला. कुणाच्याही हाताखाली काम करण्याची माझी तयारी नव्हती. बाळासाहेब ठाकरेंशिवाय अन्य कुणाच्याही हाताखाली काम करायचे नाही हे ठरविले होते.

एकनाथ शिंदे आणि फडणवीसांकडून आपल्याला सातत्याने सांगितले जात होते की, आपल्याला एकत्र यायचे आहे. पण काय नेमके हवे आहे ते कळत नव्हते. आमच्या निशाणीवर लढा असे सांगण्यात आले. पण रेल्वे इंजिन हे तुमच्या कष्टाने कमावलेले चिन्ह आहे. माझ्याकडे आयते आलेले नाही. त्यामुळे तशी निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट सांगितले.

 

यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले. त्यांनी म्हटले आहे की, सस्नेह स्वागत ! पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!

 

 

Exit mobile version