पत्रकार परिषदेऐवजी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये पंतप्रधानांकडे काही मागण्या केल्या. पण या मागण्या पंतप्रधानांकडे लेखी स्वरूपात केल्याचे किंवा त्यांच्याशी कागदोपत्री संपर्क साधल्याचे मात्र दिसलेले नाही. या मागण्या पत्रकार परिषदेत किंवा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केल्या जातात, असेच दिसले आहे. पण त्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र एक पाऊल पुढे टाकत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महाराष्ट्रातल्या परिस्थितीची माहिती करून दिली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या या दोन पानी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. संपूर्ण देश कोविडच्या साथीचा सामना करत असताना महाराष्ट्राची स्थिती बिकट आहे. वारंवार निर्बंध लावणे किंवा लॉकडाउन करणे परवडणारे नाही. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाची गरज आहे. आवश्यक तेवढ्या लसी पुरविण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राची साथ हवी, अशी विनंती राज यांनी या पत्रातून केली आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले
राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?
मागे लसीच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्रातील मंत्र्यांनी केंद्राला जबाबदार धरत हात झटकले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र अन्याय करत असल्याची ओरड केली होती. मात्र ठाकरे सरकारने केंद्राशी पत्रव्यवहार केल्याचे कुठेही जाहीर झाले नव्हते. राज ठाकरे यांनी मात्र अशी पत्रकार परिषद न घेता थेट पंतप्रधानांना पत्र लिहून महाराष्ट्रासाठी विनंती केली.
या पत्राच्या निमित्ताने मनसे आणि भाजप यांच्यातील जवळकीचीही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर ती जागा मनसे घेणार अशी चर्चा सुरू झाली.
राज ठाकरे यांच्या पत्रातील काही मुद्दे
१) महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्यावी
२) राज्यातील खासगी संस्थांना लसी खरेदी करता याव्यात
३) ‘सिरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन करून लसीची विक्री करण्याची परवानगी द्यावी
४) लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून हाफकिन, हिंदुस्थान अँटिबायोटिक अशा संस्थांना लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी
५) रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन यांचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मोकळीक द्यावी.