शिवतीर्थावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडली. त्यांच्या निशाण्यावर होते महाराष्ट्रातील सत्ताधारी महा विकास आघाडीचे सरकार. यावेळी राज ठाकरेंनी मविआ सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले. आम्ही महाराष्ट्राची परंपरा, इतिहास विसरलो आहोत. या राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये जातो? कशासाठी शंभर कोटी रुपयांची लाच मागितली म्हणून आणखी अनेक मंत्री जेलमध्ये जातात कारण त्यांचे दाऊदशी संबंध आहेत. पण तरीही ते मंत्री पदावर कायम आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलेले दिसले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने युतीला कौल दिला होता. पण मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने गद्दारी केली असा हल्लाबोल त्यांनी केला. तर जे ठरलं ते आधीच जनतेसमोर का मांडले नाही? असा सवालही त्यांनी विचारला.
उत्तर प्रदेश विधानसभा निकालांवरही राज ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय हे पाहून खरंच बरं वाटलं असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा मी म्हटले होते की त्यांनी उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार या तीन राज्यांकडे लक्ष द्यावे. तेथून लोक बाहेर पडत आहेत. आज उत्तर प्रदेशच्या विकासाच्या बातम्या ऐकून समाधान वाटते. तर लवकरच आपण अयोध्येला जाणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. फक्त आपण आत्ताच तारीख जाहीर करत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
अखिलेशचे काका शिवपाल भाजपाच्या वाटेवर?
….म्हणून दिल्लतील यूएस दूतावासाबाहेर लोकांनी पोस्टर चिकटवले
‘या’ कारणामुळे इन्फोसिस रशियातील सर्व कार्यालये बंद करणार?
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांचे लोकार्पण
यावेळी त्यांनी आमदारांना घरे देण्याच्या सरकारच्या निर्णयावरही टीकास्त्र डागले. महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला फुकट घरे द्यायला विरोध नाही. पण आमदारांना फुकट घरांची गरज काय? कोणीही मागणी केलेली नसताना मुख्यमंत्र्यांना घरे देण्याचा निर्णय जाहीर करावासा का वाटला? की त्यातही त्यांना कट हवा आहे? असा सवाल त्यांनी केला.
तर यशवंत जाधव प्रकरणावरही राज ठाकरेंनी भाष्य केले. हल्ली आई वडील मुलांना यशवंत हो म्हणत नाहीत, तर यशवंत जाधव हो असे म्हणतात. यशवंत जाधव यांच्या गहरावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या. दोन दिवस या धाडी चालल्या असा तपशील मांडत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.