ठाण्यात झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी गुढीपाडव्याच्या त्यांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांच्या यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे केलेले नामकरण आणि वापरलेल्या उपमांमुळे प्रेक्षकांमध्ये हशा-टाळ्यांचा पाऊस पडला.
प्रारंभीच त्यांनी हे स्पष्ट केले की, माझ्या दोन मागण्या आहेत मोदी सरकारकडे. त्या मागण्या पूर्ण केल्यात तर देशावर खूप उपकार होतील. या देशात समान नागरी कायदा आणा, लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणा. आम्हाला त्रास होत नाही तुमच्याकडे पाच मुले आणि आम्हाला एक. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे देश फुटेल. पण या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यामुळे मला ज्याचा विरोध करायचा तो केला. पुन्हा करीन आवडली नाही एखादी गोष्ट पण उगाच विरोध करायचा म्हणून नाही.
गुढीपाडव्याला केलेल्या भाषणानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्याचा राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आणि या नेत्यांची यथेच्छ खिल्ली उडविली. ते म्हणाले, सुप्रिया सुळे बोलतात- लाव रे व्हिडिओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचे आश्चर्य वाटते. पण एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी धाड पडते आणि सुप्रियाताईंच्या घरी नाही. याचे आश्चर्य वाटते.
एक नेता पोहोचला की पवार मोदींची भेट घेतात. पहिल्या भेटीनंतर देशमुख गेले. दुसरी भेट घेतली तेव्हा पवार म्हणाले असतील, हा नवाब मलिक खूप फाजीलपणा करतो. मग नवाब मलिक गेले. संजय राऊतबद्दलही पवार मोदींना कळकळीने बोलले. असं ते म्हणतात. पण आत काय बोलले माहीत नाही. त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणाला बोललो होतो, की पवार साहेबर खुश झाले की भीती वाटायला लागते. संजय राऊतवर ते खुश आहेत. कधी टांगलेले दिसतील कळणार नाही.
जंत पाटील (जयंत पाटील) माझ्या भाषणाबद्दल म्हणतात की, ‘हे कधी गेले होते उत्तर प्रदेशला. त्यांना आता उत्तर प्रदेशचे कौतुक वाटते.’ तर मला सांगावेसे वाटते की, जंत पाटील भाषण ऐका. मी म्हटले होते की, ज्या बातम्या कानावर येतात त्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये विकास झाला असेल तर मला आनंद आहे. गेल्या २०१४ निवडणुकीत सांगत होतो.मोदी पंतप्रधान होतील तेव्हा उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार या राज्यांचा विकास करावा. या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या माणसांचं ओझं सहन करू शकत नाही.
हे ही वाचा:
३ मे पर्यंत मशिदींवरचे लाऊडस्पीकर उतरवा नाहीतर…
शिवसेनेचा प्रवास ‘वसंत’ सेना ते ‘शरद’ सेना
वंचितच्या सुजात आंबेडकरांनी ब्राह्मणांना केले लक्ष्य
चित्रा वाघ यांनी ‘त्या’ मुलीच्या नावावर राजकारण केले
सुप्रिया सुळेंनी तर बोलायचे नाही हो. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे. मी जंत पाटील यांना सांगितले की, बेहरामपाड्यात बघा. वेगवेगळ्या वस्त्यांत बघा. भीषण अवस्था आहे. पण त्यांचा सतत आश्चर्य झालेला चेहरा. चकीतचंदू. संपलेल्या पक्षाबद्दल मी काय बोलणार म्हणे. बघा हा संपलेला पक्ष आहे का, समोर बसलेल्या भरगच्च सभेकडे हात दाखवून राज ठाकरे म्हणाले.
म्हणे विझलेला पक्ष. जंतराव मनसे हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे. मतदारसंघाच्या बाहेर यांना कुणी विचारत नाही. खरे तर राष्ट्रवादी पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्या आमदारांची मोळी. रश्शी फक्त पवारसाहेब. ही माणसं कुठल्याही पक्षात गेली तरी निवडून येतील.
राज ठाकरे यांनी भुजबळांचा उल्लेख केला. ते म्हणाले, भुजबळ म्हणतात, मी मोदी आणि भाजपाविरोधात बोललो पण मार्ग बदलला नाही. तुमचे सीए, एका माणसाने घातलेल्या केसेसमुळे तुम्ही आत गेलात. मोदींवर टीका केलीत म्हणून नाही.आणि दोन अडीच वर्ष आत गेल्यावर यांचा शपथविधीही होतो.
लाडके अजित पवार काय म्हणत आहेत बघा. ‘यांना काय म्हणे भोंगे आजच दिसले का आधr झोपा काढत होते का’ तर मी यापूर्वीही बोललो होतो. पण व्हीडिओ सापडले नाहीत. सोक्षमोक्ष लावलेला बरा म्हणून आज व्हीडिओ आणले आहेत. असे म्हणत राज ठाकरे यांनी काही व्हीडिओ सभेला दाखविले आणि त्यातून आपली भोंग्याबाबतची भूमिका जुनीच असल्याचे दाखवून दिले.