४ तारखेपासून ऐकणर नाही…भोंगे उतरले नाहीत, तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा

४ तारखेपासून ऐकणर नाही…भोंगे उतरले नाहीत, तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा

रविवार, १ मे अर्थात महाराष्ट्र दिन हा संबंध महाराष्ट्रासाठी सभा दिवस ठरला. एकीकडे मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा मुंबई येथे पार पडली तर औरंगाबाद येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या दोन्ही सभा चांगल्याच गाजल्या असून दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा लाऊड स्पिकर्सच्या मुद्द्याला हात घालत सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी ४ मे चे अल्टिमेटम दिले आहे. जर ४ तारखेच्या आत मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत तर सगळीकडे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
मी आत्तापर्यंत मुंबईत आणि ठाणे अशा दोनच सभा घेतल्या. पण या दोन सभांवर किती बोलतायंत? ठाण्याची सभा पाहून संभाजीनगरची सभा ठरली. तर पुढच्या सभा मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यात होणार आहेत. विदर्भ, कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे जाणार आहे आणि मी कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणारच आहे असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या दोन्ही राजधान्या मूळच्या मराठवाडयाच्या. देवगिरीचा किल्ला आणि पैठण. आजच्या महाराष्ट्र दिनी जरा महाराष्ट्र समजून घेणे गरजेचे आहे. कारण जो प्रदेश आपला इतिहास विसरतो त्याच्या पायाखालून भूगोल निसटतो. अल्लाउद्दीन खिलजी या राज्यावर चाल करून आला. रामदेवराव यादव हा आमचा राजा बेसावध राहिला. त्याने एक लाख लोकं घेऊन येतो सांगितलं. प्रत्यक्षात काही हजार लोकं आलेली. किल्ल्यात फितुरी झाली आणि खिल्जी आमची महाराष्ट्राची कन्या पळवून घेऊन गेला. त्यानंतर महाराष्ट्रात अंधःकार होता. अत्याचार होत होते. मग पैठणला संत एकनाथ महाराजांनी आरोळी दिली ‘दार उघड बये दार उघड’! हे दार १६३० साली उघडले. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

१६८० ला महाराज गेले आणि १६८१ ला औरंगजेब इथे आला. इथे आला आणि नंतर परत कधीच गेला नाही. इथेच मेला. त्याच्याशी संभाजी महाराज लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी लढल्या. पण त्या औरंगजेबाने आपल्या पत्रात लिहून ठेवलं ‘शिवाजी मला अजून छळतोय’ कारण शिवाजी महाराज हे फक्त एक व्यक्ती नव्हते. तो एक विचार होता, प्रेरणा होती ज्याच्या जीवावर हे सगळे लोक लढत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलाय ज्या दिवशी आमच्या लोकांच्या अंगात शिवाजी नावाचे भूत संचारेल तेव्हा आम्ही जग पादाक्रांत करू.

पण आता या राज्याची काय अवस्था करून ठेवल्ये? अब्रू वेशीवर टांगली गेल्ये. शरद पवार म्हणतात ‘हे दोन समाजात दुही माजवतायत’ पण पवार साहेब आपण जाती जातीत भेद निर्माण करताय त्यामुळे दुही माजत्ये. हातात पुस्तक घेतल्यावर लेखकाचे नाव बघितल्यावर आधी त्याची जात बघायची. शरद पवारांच्या आणि राष्ट्रवादीच्या सभा बघा कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याचे दिसणार नाही. मी बोलल्यावर आता नाव घ्यायला लागले. मी शरद पवार हे नास्तिक असल्याचे म्हटल्यावर झोंबलं. पण तुमची कन्या हे लोकसभेत बोलली आहे.

मला सल्ले देतात की आजोबांचे साहित्य वाचा, ते हिंदुत्वाच्या विरोधात होते. पण मी माझ्या आजोबांचे साहित्य वाचले आहे. तुम्ही फक्त तुमच्या सोयीचे वाचलेत. माझे आजोबा हिंदुत्वाच्या विरोधात नव्हते, भटभिक्षुकीच्या विरोधात होते. ख्रिश्चन मिशनऱ्यांना उत्तर द्यायला हिंदू मिशनरी चळवळ प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरु केली. सार्वजनिक नवरात्रोत्सव माझ्या आजोबांनी सुरु केला. ‘उठ मराठा जागा हो’ हे पुस्तक माझ्या आजोबांनी हिंदुत्वाबद्दल लिहिलंय.

आपण सगळ्यांकडे जातीने बघायचंय का? शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी कोणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली. लोकमान्य टिळकांनी पहिले वृत्तपत्र काढले त्याचे नाव काय तर ‘मराठा’! मग लोकमान्य टिळकांकडे काय ब्राह्मण म्हणून बघायचं का?

जेम्स लेन प्रकरण का काढले? त्यामुळे वृद्धपकाळात बाबासाहेब पुरंदरेंना त्रास दिला. जेम्स लेन याने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी बोललो नसल्याचे स्पष्ट केले. रामदास स्वामींकडे पण जातीने बघतात.

हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहेच. पण त्या आधी छत्रपती शिवरायांचा आहे. ज्यांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्या महाराष्ट्रात काय एकमेकांकडे जातीच्या चषम्यातून बघायचं का? हे विष आता शाळेत पोहोचत आहे. असा महाराष्ट्र हवाय का आपल्याला?

हे ही वाचा:

एप्रिलमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

फर्स्ट क्लास लोकलचा प्रवास झाला स्वस्त

‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’

“भोंगे काढायला सांगितले तर हातभार फाटली आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली”

मी लाऊड स्पिकरच्या विषयाला हात घातला. तो पहिल्यांदा नाही घातला किंवा यावर बोलणारा मी पहिला नाही. पण मी फक्त त्याला पर्याय दिला. जर लाऊड स्पिकर उतरले नाहीत तर आम्ही हनुमान चालीसा म्हणू. मला जातीय तेढ निर्माण करायची नाही. दंगली घडवायच्या नाहीत. हा धार्मिक प्रश्न नाही. सामाजिक प्रश्न आहे. जनतेला त्रास होतो. माझ्याकडे मुस्लिम पत्रकाराने भेटूनही तक्रार केली की लाऊड स्पिकरमुळे आमच्या घरातील लहान मुले झोपू शकत नाहीत असे राज ठाकरे यांनी सांगितले.

जर उत्तर प्रदेशातले लाऊड स्पिकर उतरू शकतात तर महाराष्ट्रातले का नाही? हे सगळे स्पिकर्स अनधिकृत आहेत. औरंगाबादमध्ये ६०० मशिदी आहेत अशी माहिती कळली. इथे बांगेची कॉन्सर्ट चालते का? सगळ्या गोष्टी हिंदूंनीच का सहन करायच्या? तुम्ही मशिदीवर भोंगे वाजवणार, रस्त्यात नमाज पढनार. कोणी अधिकार दिले तुम्हाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला

३ तारखेला ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेपासून ऐकणर नाही. जर ३ तारखेपर्यंत भोंगे उतरले नाहीत तर सगळीकडे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजलीच पाहिजे. पोलिसांची परवानगी घ्या आणि हनुमान चालीसा लावा असा आदेश राज ठाकरे यांनी दिला. विनंती करून समजत नसेल तर आमच्यापुढे दुसरा पर्याय उरत नाही. जर याला तुम्ही धार्मिक प्रश्न बनवत असाल तर त्याला धर्मानेच उत्तर द्यावे लागेल असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

शाहीर साबळेंवरली चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर प्रदर्शित
औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ही सभा सुरु होण्या आधीपासूनच चांगलीच चर्चेत आली होती. पोलिसांनी या सभेसाठी अनेक प्रतिबंध घातले होते. या सर्वांचे पालन करूनच ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच शाहीर साबळे यांच्यावर येऊ घातलेल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर लाँच करण्यात आले. दिग्दर्शक केदार शिंदे हे हा चित्रपट घेऊन येत आहेत. तर अभिनेते अंकुश चौधरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे.

Exit mobile version