23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणकाँग्रेसच्या पलीकडे एक राजकीय व्यवस्था देशाचा कारभार चालवू शकते, ही खात्री अटलजींनी...

काँग्रेसच्या पलीकडे एक राजकीय व्यवस्था देशाचा कारभार चालवू शकते, ही खात्री अटलजींनी दिली!

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना

Google News Follow

Related

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत असून अनेक राजकीय दिग्गजांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त खास पोस्ट लिहिली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्यांबद्दल राज ठाकरे यांनी लिहिले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या भावना पोस्टमधून व्यक्त करताना म्हटले आहे की, “आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलबिहारी वाजपेयी हे अग्रणी होते. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफीच्या अनावरण सोहळ्याला अटलबिहारी वाजपेयी यांनी यावे यासाठी त्यांना विनंती केली आणि त्यांनी देखील तात्काळ मान्यता देत, ते या सोहळ्याला आले,” अशी आठवण राजा ठाकरे यांनी सांगितली.

पुढे राज ठाकरे यांनी लिहिले की, “भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्याय नाहीच असं वाटत असताना, अनेक घटकपक्षांची मोट बांधून, त्यांचे सर्व रागरंग सांभाळून अटलबिहारी वाजपेयी यांनी सरकार चालवलं आणि ते देखील मागच्या शतकाच्या अखेरीस, जेव्हा भारतात राजकीय, आर्थिक, सामाजिक घुसळण सुरु होती. अशा कठीण परिस्थितीत सरकार चालवत त्यांनी भारतीयांना एक खात्री दिली की काँग्रेसच्या पलीकडे देखील एक राजकीय व्यवस्था या देशाचा कारभार चालवू शकते. आज भारतीय जनता पक्ष जो सत्तेत दिसतोय त्याचा भक्कम पाया अटलबिहारी वाजपेयी यांनी घातला. साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलबिहारी वाजपेयी यांची वाणी ही जशी मला आकर्षित करते तसंच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद देखील मला कायम आकर्षित करत आला आहे. जनसंघ ते भारतीय जनता पक्ष असा प्रवास करत असताना, आणि एकदा तर भारतीय जनता पक्ष दोन खासदारांवर येऊन थांबलेला असताना आणि जनता पक्षाच्या सरकारमधला सहभाग सोडला तर जवळपास ४५ वर्ष विरोधी बाकांवर बसून देखील त्यांच्यातील राजकीय आशावाद तसूभर पण कमी झाला नाही,” असं राज ठाकरे यांनी लिहिले आहे.

हे ही वाचा..

अरविंद केजरीवाल यांना घरचा आहेर

केजरीवाल यांची ‘महिला सन्मान योजना’ अस्तित्वातच नाही? दिल्ली सरकारनेचं केले स्पष्ट

संसद भवनाजवळ एकाने स्वतःला घेतलं पेटवून; पोलिसांना सापडली अर्धवट जळालेली चिठ्ठी

अन्सारुल्ला बांगला टीमच्या दोन दहशतवाद्यांना अटक

“तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून झालेली अहवेलना, आणीबाणीच्या काळात सहन केलेले अत्याचार, हे अटलबिहारी वाजपेयी यांनी सोशिकपणे सोसले, पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही, की दीर्घकाळ विरोधी पक्षांत बसलो म्हणून जबर राजकीय महत्वकांक्षा जागृत होऊन त्यांनी सत्तेत आल्यावर राजकीय शालीनता सोडली नाही. म्हणूनच काँग्रेसकट इतर सर्व पक्षातील लोकांच्या मनात अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल कमालीचा आदर होता आणि आजदेखील आहे. सत्तेत नसताना आणि सत्तेत असताना त्यांच्यातील कलासक्त मन त्यांनी कोमेजू दिलं नाही. राजकरण्याच्या मनात फक्त राजकारणाचा विचार असून उपयोग नाही, तर त्यात कलासक्तता देखील हवी. जी अटलबिहारी वाजपेयी यांच्यात होती. अटलजींचे असे अनेक पैलू मला कायम आकर्षित करत आले आहेत. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन,” अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा