महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणांमधून मांडलेल्या मुद्द्यांवरून महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर आज मुंबई मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली.
आगामी अयोध्या दौरा, ३ मे रोजी आयोजित केलेल्या महाआरतीची तयारी, औरंगाबाद येथील सभेचे आयोजन अशा मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ५ जून रोजी राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. अयोध्येचा दौरा मोठा करण्यासाठी मनसेच्या वतीने काही रेल्वे गाड्या बूक करण्यात येणार आहे.
३ मे अक्षय तृतीयेला महा आरतीचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. तसेच औरंगाबाद येथील सभेसाठीच्या पूर्वतयारीवर चर्चा झाल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.
हे ही वाचा:
ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त
महापालिकेची पोल खोलच्या भीतीने शिवसैनिकांनी स्टेजची केली तोडफोड
गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर राज्यात याचे पडसाद उमटले होते. तसेच या भोंग्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयी गृहमंत्र्यांना पत्र लिहून झेड प्लस सुरक्षेची मागणी केली असल्याचे ते म्हणाले.