राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात फटकारले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतात हिंदुत्ववाद्यांना हटवा आणि हिंदुंचे राज्य आणा असे आवाहन उत्तर प्रदेशात केले होते. त्याचा खरपूस समाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतला आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हा देश हिंदू आणि हिंदुत्ववाद्यांचा नाही तर मग या देशात काय आफ्रिकन लोक राज्य करत आहेत का?
नाशिकच्या दौऱ्यावर त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि नंतर पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर उत्तरे दिली.
एसटीच्या संपाबाबत त्यांनी आपले सविस्तर मत व्यक्त केले. ते म्हणाले की, एसटी संपावर लवकर तोडगा निघायला हवा. अरेरावी कशाला करण्याची गरज आहे. लोकांनी तुमच्या हाती जर सरकार दिले आहे तर एसटी कर्मचाऱ्यांना समजून घ्या. एक लाख कर्मचारी जर अंगावर आले तर काय कराल?
राज ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. तेव्हा एसटी संपाबाबत आम्ही चर्चा केली. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. ते सध्या आजारी असल्याने या विषयावर त्यांच्याशी बोलणे झालेले नाही.
राज ठाकरे यांनी सांगितले की, एसटीला फायद्यात आणायचे असेल तर खासगीकरण नको पण त्यासाठी एखादी कंपनी स्थापन केली पाहिजे. त्या कंपनीच्या माध्यमातून एसटी चालवा.
हे ही वाचा:
नाफ्ताली बेनेट यांचा ऐतिहासिक युएई दौरा
प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण
येत्या उत्तर प्रदेश निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही
मनसे आणि भाजपा युतीची चर्चा सुरू असल्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, युतीच्या चर्चा तुमच्याकडूनच मला कळल्या आहेत. तुम्हाला कुठून माहिती मिळते हे समजत नाही. या चर्चा तुम्हीच घडवून आणता.