राज ठाकरे यांचा बहुचर्चित असा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याबद्दल राज ठाकरे म्हणाले की, दौरा स्थगित केल्यानंतर अनेकांना आनंद झाला आणि अनेकांना वाईटही वाटलं. यावरून टीका होणार याची कल्पना होती म्हणून मधले दोन दिवस दिलेले होते. तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला. मी आयोध्येला जाणार हे बोललो आणि उत्तर प्रदेशमध्ये येऊ देणार नाही हे प्रकरण सुरू झालं. या दरम्यान मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून माहिती मिळत होती. त्यानंतर लक्षात आलं की, हा एक मोठा सापळा आहे. त्यात आपण अडकायला नको. अयोध्या वारी खुपणारे अनेक जण होते आणि या विरोधाला महाराष्ट्रातूनच सुरुवात झाली होती, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
अयोध्येत जाऊन राम जन्मभूमीचे दर्शन घ्यायचेच होते पण अजून एक कारण होतं ते म्हणजे मुलायम यांच सरकार होतं तेव्हा कारसेवकांना ठार करण्यात आलं होत. त्यांची प्रेतं शरयू नदीवर तरंगत होती. त्या जागेचं दर्शन घ्यायचं होत. पण, मी हट्टाने गेलो असतो तर माझ्यासोबत महाराष्ट्रातून हजारो लोक आले असते आणि तिथे काही झालं असत तर मनसैनिक नक्कीच त्यांच्या अंगावर धावून गेले असते. त्यानंतर त्यांनी मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले असते, तुरुंगात टाकले असते, सगळा सिसिमिरा तुमच्या मागे लागला असता आणि इथे निवडणुकीच्या वेळी कोणीच नाही, असा हा सगळा सापळा होता. नाहीतर एक खासदार मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो ते कसं शक्य आहे. आता अचानक राज ठाकरेंनी माफी मागावी यासाठी कशी जाग आली? आणि माफी मागण्याचाच विषय आहे तर, २०१७ मध्ये उत्तर भारतीयाकडून बलात्काराचा गुन्हा घडला होता तेव्हा अनेकांना गुजरातमधून हाकलण्यात आलं होत. गुजरातमधून कोण माफी मागणार आहे? असे सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
जनतेने राजकारण समजून घ्यायला हवे. आपल्या विरोधात जायचे असेल तेव्हा एकत्र येतात नाहीतर भांडत असतात. मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवायचा मुद्दा काढताच राणा दाम्पत्य उठलं आणि म्हणे ‘मातोश्री’ समोर हनुमान चालीसा म्हणणार. अरे ‘मातोश्री’ म्हणजे म्हणजे मशीद आहे का? असा खोचक सवाल विचारत राज ठाकरे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर टीका करण्यात आली तेव्हा शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांना काहीही बोलत होते. त्यानंतर हेच लडाखमध्ये एकत्र बसून जेवले. हे सगळे ढोंगी आहेत, अशी सणसणीत टीका राज ठाकरे यांनी केली.
हे ही वाचा:
राज यांचा शरद पवारांना टोमणा आणि मोदींना विनंती
‘उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी आंदोलनाची केस आहे का?’
लेसबियन एलिमेंट: गरज, अपरिहार्यता की पब्लिसिटी स्ट्रॅटेजी?
… म्हणून इम्रान खान यांनी भारतावर उधळली स्तुतीसुमने
भोंगा आंदोलन हे तेवढ्यापुरत नव्हतं. आपण शांत झालो की ते पुन्हा सुरू होणार. आंदोलन प्रत्येकवेळी रस्त्यावर येऊन करायला हवे असं नाहीये पण सहकार्य करायला हवे. सर्व पदाधिकाऱ्यांना लवकरच एक पत्र देणार आहे. ते पत्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहचलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.