उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. अयोध्येला जाण्यापासून कोणाला रोखले जाऊ नये, असे मत फडणवीसांनी दिले आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सल्ल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गरज असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भोंग्यांबद्दल पत्र लिहले आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंनी या ठाकरे सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. जसे आम्ही ठाकरे सरकारविरोधात लढत आहोत त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी सुद्धा लढावे, असं फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले, राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा पठणाची घोषणा केल्यानंतर त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. राणा दाम्पत्याला १२ ते १४ दिवस तुरुंगात ठेवले, यासारखे सूडबुद्धीची काम ठाकरे सरकार करत आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार उत्तम काम करत आहे. जनतेचा मोदी सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बहुमूल्य सल्ल्याची गरज उद्धव ठाकरेंना आहे. पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, गरिबी, १२ बलुतेदार आणि युवक यांच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावे, असा सल्ला फडणवीसांनी पवारांना दिला आहे.
हे ही वाचा:
महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न
‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?
ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार
‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!’ राज ठाकरेंचा लेटरबॉम्ब
दरम्यान, उत्तर प्रदेशचे एक कार्यालय मुंबईत उघडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर जी काही राजकीय वर्तुळात चर्चा चालली आहे त्याला पूर्णविराम देऊन कामावर लक्ष देण्याचा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. ते म्हणाले, उत्तर प्रदेशचे एखादे कार्यालय जर मुंबईत उघडले तर यात काही नवल नाही. त्याचा महाराष्ट्रावर काही परिणामही होणार नाही. मात्र ठाकरे सरकार जे राजकारण करत आहे. तुरुगांतून काही मंत्री ‘वर्क फ्रॉम जेल’ करत आहेत याचा नक्कीच महाराष्ट्रावर परिणाम होतोय असं फडणवीस म्हणाले.