टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई
काँग्रेसच्या टूलकिट प्रकरणावरून पक्षपाती भूमिका घेत असल्याबद्दल केंद्र सरकारने ट्विटरला इशारा दिल्यानंतर आता दिल्ली आणि गुरगांव येथील ट्विटरच्या कार्यालयांवर दिल्ली पोलिसांनी छापे मारले आहेत. त्यामुळे या टूलकिट प्रकरणात केंद्र सरकारला आव्हान देऊ पाहणाऱ्या ट्विटरचे धाबे दणाणले आहे.
या टूलकिट प्रकरणावरून ट्विटरने भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या ट्विटवर फेरफार केल्याचा शिक्का मारला होता. त्यावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने निषेध करणारे पत्र ट्विटरला पाठविले होते.
मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत सुनावले की, पात्रा यांच्या ट्विटवरील हा शिक्का ताबडतोब काढण्यात यावा आणि ज्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यात सोशल मीडियाच्या मंचावर स्वतःच निर्णय घेऊ नये.
हे ही वाचा:
एमसीएच्या लोकायुक्त ताहिलरामाणी काय निर्णय घेणार?
‘छत्रपती संभाजी महाराजांबाबतचे ‘ते’ उल्लेख पुराव्यांच्या कसोटीवर न टिकणारे’
काँग्रेसचे गोडवे गाणाऱ्या देवरांना स्वराज कौशलनी सुनावले
मंत्रालयाने नमूद केले की, अशा पद्धतीने शिक्का मारणे हे पूर्वग्रहदूषित आहे आणि चौकशीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न त्यातून होत आहे. अशा प्रकारचे पाऊल उचलले गेल्यामुळे ट्विटरची निष्पक्ष असल्याची प्रतिमा भंग पावते. या टूलकिट प्रकरणाच्या चौकशीतून टूलकिटबाबतचे गांभीर्य स्पष्ट होते, त्यात ट्विटरचा काहीही संबंध नाही. त्यांनी या चौकशीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये.
पात्रा यांनी हे टूलकिट प्रकरण बाहेर काढल्यानंतर काँग्रेसने कॅलिफोर्निया येथील ट्विटरच्या मुख्यालयात तक्रार दाखल करून पात्रा यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद करण्याची मागणी केली होती. त्यासोबतच भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह काही भाजपा नेत्यांचे अकाऊंटही कायमचे बंद करण्याची मागणी त्यात होती.
काँग्रेसच्या या टूलकिटमधून नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची कशी बदनामी करता येईल, याचा आराखडा आखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. कुंभ मेळ्यामुळे कसा कोरोनाचा प्रसार झाला, यासारख्या केंद्र सरकारविरोधातील विविध गोष्टींचा प्रचार करण्यासाठी या टूलकिटचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप होत होता.
ट्विटरने मागे कंगना रनौटचे अकाऊंट बंद केले होते. पण आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या शर्जिल उस्मानीच्या ट्विटर अकाऊंटवर मात्र त्यांनी कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे ट्विटरच्या या एकूण कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली गेली आहे.