मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेताना भाजपाशी जुळवून घ्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांना देत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविली. त्यानंतर आता खासदारांमध्येही चलबिचल असल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळू लागली आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असे पत्र खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहून पक्षनेतृत्वाला आणखी एक धक्का दिला आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला होत असून त्यासाठी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्यासमोर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा उभे आहेत. सिन्हा यांना काँग्रेस व यूपीए आघाडीतील घटकपक्षांचा पाठिंबा आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीत असतानाही मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन शेवाळे यांनी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा उभे आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या पार्श्वभूमी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता त्यांना पाठिंबा द्यावा अशी आपल्याला नम्र विनंती.
शेवाळे यांनी म्हटले आहे की, मुर्मू या आदिवासी समाजातील असून त्यांचे सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्या शिक्षिका होत्या. ओदिशा सरकारच्या सिंचन विभागात त्या कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होत्या. झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
शेवाळे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरणही त्यात दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता महाराष्ट्राच्या म्हणून प्रतिभाताई पाटील या यूपीएच्या उमेदवार असूनही त्यांना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांनाही त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता शिवसेनेच्या खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असे आदेश द्यावेत.
हे ही वाचा:
शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरील प्राणघातक हल्ल्याविरोधात मोर्चा
‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’
मुस्लिमांची संख्या ७५ टक्के म्हणून शाळेतील प्रार्थना बदलली!
शेवाळे यांनी केलेल्या या विनंतीला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांनी शेवाळे यांचे म्हणणे ऐकले नाही तर शेवाळे काय पाऊल उचलतात हेही महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता खासदारांकडूनही उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे आव्हान दिले जात आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.