४५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद हे नेहमीच वादापासून दूर राहिले. पण सध्याच्या काँग्रेसच्या स्थितीवर आता बोलण्याची वेळ आली आहे, असे आझाद म्हणाले. जम्मूच्या रामबन भागात एका रॅलीला संबोधित केल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचे नाव घेण्याचे टाळत सध्याच्या काँग्रेस नेतृत्वात पक्षांतर्गत लोकशाहीची कमतरता यावर स्पर्श केला.
“काँग्रेसची सध्याची पिढी सूचनांसाठी खुली नाही. जर काही ज्येष्ठ सदस्यांनी सल्ला दिला तर ते गुन्हा किंवा बंड म्हणून पाहिले जाते.” आझाद म्हणाले की, वरिष्ठ नेत्यांचा सल्ला अपमान किंवा आव्हान म्हणून घेऊ नये.
आझाद हे २३ वरिष्ठ नेत्यांमध्ये आहेत, ज्यांना मीडियाद्वारे G23 किंवा ग्रुप ऑफ २३ असे संबोधले जाते, ज्यांनी गेल्या वर्षी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून असे सुचवले होते की पक्षाने निवडणुकीतील पराभवाचे आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि नवीन रणनीती आखली पाहिजे. या गटाने अध्यक्ष निवडण्यासाठी संघटनात्मक मतदानापासून सुरुवात करून पक्ष प्रक्रियेचे लोकशाहीकरण करण्याच्या गरजेवर भर दिला होता.
आझाद यांनी रविवारी वृत्तवाहिनीला सांगितले की नेत्यांचे सोनिया गांधींशी चांगले संबंध आहेत, परंतु तरुण पिढी वरिष्ठांचे ऐकण्यास उत्सुक नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ३०० जागा जिंकताना दिसत नाहीत. या त्यांच्या अलीकडील टिप्पणीबद्दल विचारले असता, आझाद यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाने ३०० पेक्षा जास्त जागा जिंकल्याचा आणि नरसिंह राव यांच्या नेतृत्वात २५० पेक्षा जास्त जागा जिंकल्याचा उल्लेख मी करत होतो. “गेल्या काही दशकांमध्ये आम्ही खूप कमी जागा जिंकल्या आहेत. ते सर्वांनी पाहण्यासारखे आहे.” ते म्हणाले.
हे ही वाचा:
‘मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?’
विक्रमवीर अजाझ पटेलने एमसीएला दिली ही अनोखी भेट
चैत्यभूमीवर अनुयायी आक्रमक; दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदला!
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष स्वीकारणार हिंदू धर्म…वाचा सविस्तर
“जेव्हा आमचा सल्ला ऐकला जात नाही तेव्हा त्रास होतो. पक्षाच्या सर्वांगीण सुधारणेसाठी आम्ही सूचना देतो. आमच्यापैकी कोणालाही पक्षात पद नको आहे. पक्षाची कामगिरी सुधारावी एवढीच आमची इच्छा आहे,” ते म्हणाले. “हा असा काळ आहे जेव्हा सत्ताधारी पक्ष मजबूत असतो आणि विरोधी पक्ष कमकुवत असतो. कमकुवत विरोधी पक्षाचा फायदा सत्ताधारी पक्षाला होतो.”