काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहुल गांधींनी आपल्या २ सहकाऱ्यां समवेत संरक्षण विषयातील एक महत्वपूर्ण बैठक अर्धवट सोडली. राहुल गांधी हे सरंक्षण विषयातील स्थायी समितीचे सदस्य आहेत. १६ डिसेंबर रोजी या समितीची बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैठकीला भारताचे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ जन. बिपीन रावत आणि संरक्षण सचिव अजय कुमार हे उपस्थित होते.
भाजप खासदार जुअल ओरम हे या समितीचे अध्यक्ष आहेत. बैठकीत सैन्याच्या गणवेशावरून चर्चा होत असताना राहुल गांधी यांनी त्यावर आक्षेप घेतला. यावेळी अध्यक्षांनी गांधी यांना बोलण्याची संधी दिली नाही असे काँग्रेसचे म्हणणे आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी बैठक सोडण्याचा निर्णय घेतला.
“राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्वाच्या मुद्द्यांना बाजूला ठेऊन सैनिकांच्या गणवेशाची चर्चा करत समिती वेळ वाया घालवते” असा आरोप गांधी यांनी केला आहे.