नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोमवार, १३ जून रोजी ईडीने साधारण आठ तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने आज, १४ जून रोजी पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
नॅशनल हेराल्डमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल राहुल गांधी यांची चौकशी झाली. दुपारी १२ वाजेपासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत अशी एकूण साडे आठ तास राहुल गांधींची ईडीकडून चौकशी करण्यात आली. पहिल्या सत्रात तीन तास आणि दुसऱ्या सत्रामध्ये साडे पाच तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्यांना आज चौकशीला हजर राहावे लागणार आहे.
दरम्यान, काल राहुल गांधी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाताच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. देशभरात दिल्लीसह मुंबईमध्ये काँग्रेसने पोलिसांची परवानगी नसताना आंदोलनं केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याचं चित्र होतं.
हे ही वाचा:
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त मोखाड्यात कार्यक्रम
“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”
परदेशात बँक खाते आहे का, किती रक्कम आहे? ईडीने राहुलना विचारले!
सदाभाऊ खोतांची विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार
‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र काढले होते. २००८ मध्ये हे वृत्तपत्र बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘यंग इंडिया’ कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर आहेत. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.