राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधित आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने या विरोधात त्यांची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दाखल न्यायालयाने घेत राहुल गांधींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात वीर सावरकरांबद्दल वक्तव्य केलं होतं. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली, त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिलं होतं की, मला तुमचे सेवक व्हायचं आहे. घाबरून त्यांनी माफीनाम्यावर सही केली होती, अशा आशयाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केलं होतं.
नृपेंद्र पांडे यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, १७ नोव्हेंबर रोजी समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटीशांचे सेवक म्हटलं आणि त्यांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याचं सांगितलं. राहुल गांधी हे त्यांच्या वक्तव्यांनी समाजात तेढ निर्माण करत असून त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या भवितव्याचा निर्णय उन्हाळी सुट्टीनंतर
शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती
समाजवादी पक्षाचे आमदार तसेच त्यांच्या मुलांनी घातला ४५ लाखांचा गंडा
प्रतिभा पवारांच्या साक्षीने थोरल्या पवारांचा राजीनामा
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी सीआरपीसीच्या कलम १५६(३) अंतर्गत अधिवक्ता नृपेंद्र पांडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर चौकशी करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने हजरतगंज पोलीस ठाण्याला या प्रकरणाचा तपास निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या वतीने करण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ जून रोजी होणार आहे.