काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सलग तिसऱ्या दिवशी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणीच्या चौकशीसाठी आजही राहुल गांधी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राहुल गांधी यांची जवळपास १८ तास चौकशी केली. मात्र, ईडीचे प्रश्न अद्याप संपलेले नाही, त्यामुळे आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आलं आहे.
नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात राहुल गांधी यांची सोमवारी, १३ जून रोजी सुमारे साडे आठ तास चौकशी करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार, १४ जून रोजी सुमारे दहा तासांहून अधिक काळ राहुल गांधी यांची चौकशी चालली. त्यानंतर त्यांना आज, १५ जून रोजी पुन्हा ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांना ईडीच्या उपसंचालक, सहायक संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले. तसेच ईडीने प्रथम राहुल गांधी यांना वैयक्तिक प्रश्न विचारले. त्यानंतर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी राहुल गांधी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जाताच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही शहरांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याचं चित्र होतं.
हे ही वाचा:
आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये
कुलगाममध्ये बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’
प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात
‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र काढले होते. २००८ मध्ये हे वृत्तपत्र बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘यंग इंडिया’ कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर आहेत.