राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेत फलक आणण्यास प्रवृत्त केले

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांचा दावा

राहुल गांधींनी विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेत फलक आणण्यास प्रवृत्त केले

‘संसदेच्या कामकाजात सहभाग घ्यायचा नाही, हे विरोधी पक्षांच्या खासदारांनी आधीच ठरवल होते. राहुल गांधी यांना संसदेचे कामकाज व्हावे, असे कधीच वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेत गोंधळ घालण्यास, त्यांना निषेधाचे फलक आणण्यास प्रवृत्त केले,’ असा दावा संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. संसदेतील विरोधी पक्षांच्या सुमारे १४६ खासदारांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर जोशी बोलत होते.

‘विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद अधिवेशनाच्या कोणत्याही चर्चेत सहभाग घ्यायचा नाही, हे आधीच ठरवले होते. त्यामुळे त्यांनी अशी कृती केली. ज्यामुळे सभापतींसमोर त्यांचे निलंबन करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता,’ असा आरोप जोशी यांनी केला.

‘सभापतींनी वैयक्तिकरीत्या विरोधी पक्षांसह सर्व खासदारांची बैठक घेऊन कोणीही निषेधाचे फलक आणून अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणू नये, अशी विनंती केली होती. निषेधाच्या फलकांवर पूर्णतः बंदी होती आणि याबाबतचा ठराव मांडण्यातही आला होता. या बैठकीत सर्वांनी निषेधाचे फलक न आणण्याचे ठरवले होते. सुरुवातीला सर्वजणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतर अचानक कोणीतरी सूचना केल्याने त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली,’ असा दावा जोशी यांनी केला.

‘शेवटच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी काय केले? त्यांना मणिपूर प्रकरणात चर्चा हवी होती. मी याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्या दोघांनीही चर्चेसाठी तयारी दर्शवली होती. जेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन हवे होते. संसदेचे कामकाज होऊ नये, हे त्यांनी आधीच ठरवले होते,’ असा दावा जोशी यांनी केला. ‘जे झोपलेले असतात, त्यांना आपण जागे करू शकतो, पण जे झोपण्याचे नाटक करत असतात, त्यांना आपण जागे करू शकत नाही,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘तोंड सांभाळून बोला…’

कर्तव्यपथावर बजरंगने ‘पद्मश्री’चा केला त्याग

ब्रिटिशकालिन कायदे बदलले हा ऐतिहासिक क्षण!

डॉ. बालाजी आसेगावकर यांना केशवसृष्टी पुरस्कार

‘संसद सुरक्षाभंग प्रकरणाचा तपास सुरू’

सुरक्षाभंगाचे प्रकरण संपूर्णपणे चेंबरमध्ये झाले. सभापतींनी जाहीर केल्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून उच्चस्तरीय चौकशी समितीही या प्रकरणी नेमण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असून काही जणांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही काहीच निवेदन दिले नाही, असे कसे म्हणू शकता? किमान प्राथमिक चौकशीचा अहवाल तरी समोर येऊदे. त्याआधीच आम्ही निवेदन कसे देणार?, असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला.

Exit mobile version