‘विद्वानांचा’ नेता

‘विद्वानांचा’ नेता

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील ‘विदूषक’ म्हणून आपले स्थान बळकट करण्याच्या दृष्टीने गेली अनेक वर्ष फारच निष्ठेने प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमधील सातत्य हे खरेच वाखाणण्याजोगे आहे. अंगीभूत असलेल्या नवनवीन कला रोज रोज गेली अनेक वर्ष दाखवून लोकांचे मनोरंजन करणे हे सोपे काम नव्हे. बरं हे करत असताना त्यात एकसुरीपणा येऊ नये याचीही फार प्रकर्षाने ते काळजी घेताना दिसतात.

मग कधी ते भर संसदेत मिठी मारणे आणि डोळे मारण्याचे कार्यक्रम करतात. तर कधी हटके अशा मुलाखती देतात. त्यांची जाहीर सभांमधील भाषणे तर आजच्या अनेक स्टॅन्ड अप कॉमेडियन म्हणून मिरवणाऱ्यांना तोंडात मारण्यासारखी असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी विश्वेश्वरय्या यांच्या नावाचा उल्लेख करताना जी शाब्दिक कसरत करून दाखवली ती आजही लोकांच्या स्मरणात आहे.

काल म्हणजेच १५ सप्टेंबरला त्याच विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्या या प्रतिभेचे दर्शन साऱ्या देशाला घडवून दिले. महिला काँग्रेसच्या वर्धापन दिनी ते बोलत होते. आता महिला सक्षमीकरणाविषयी राहुल गांधी यांचे विचार साऱ्यांना माहीतच आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देताना ते याच एका मुद्द्यावर येत होते. त्यामुळे महिलांसाठी कार्य करायला ते किती आग्रही आहेत हे स्पष्ट होते. म्हणूनच बहुदा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा या महिला नेत्या असून देखील महिला काँग्रेसच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्यापेक्षा दुसरे योग्य नाव असुच शकत नाही.

या कार्यक्रमात राहुल गांधींनी त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार मांडणी केली. “महात्मा गांधी यांच्या आजुबाजूला कायम तीन-चार महिला असायच्या, तशा महिला मोहन भागवत यांच्या आजूबाजूला आपण कधी पाहिल्या आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. अर्थात राहुल गांधींचा हा ‘सत्याचा प्रयोगच’ होता.

हे ही वाचा:

पाकिस्तानसारख्या “फेल्ड स्टेट” कडून धड्यांची गरज नाही

२१ दिवस क्वारंटाईन करूनही चीनमध्ये कोरोना कसा?

स्वातंत्र्यवीर सावरकर नव्हे, नेहरूच होते माफीवीर!

भूपेंद्र पटेल सरकारमध्ये सर्व नवीन चेहऱ्यांना संधी

मुळात नारी शक्ती विषयी आदर आणि सद्भाव असण्यासाठी आजूबाजूला महिला घेऊन फिरणे गरजेचे नसते. पण हे समजून घेण्याची राहुल गांधींची बौद्धिक क्षमता नाही. कारण ही गोष्ट समजून घ्यायला मुळात आधी भारतीय संस्कृती समजून घेणे गरजेचे असते. स्वामी विवेकानंद यांचा महिलांच्या घोळक्यातला फोटो दिसत नाही. पण स्वामीजींच्या विचारांनी भारतीयच नाही तर परदेशातील महिलाही इतक्या प्रभावी होत्या की अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. एकदा एक परदेशी महिला स्वामी विवेकानंदांना म्हणाल्या होत्या की मला तुमच्या सारखा पुत्र हवा आहे. तेव्हा स्वामीजी स्मित हास्य करत म्हणाले होते की ‘माते मी तुझाच तर पुत्र आहे’. महिलांप्रती हे भाव असायला त्यांचा घोळका आजूबाजूला असणे गरजेचे नसते.

राहुल गांधी यांचा बौद्धिक आवाका लक्षात घेता त्यांच्याकडून अशा अवास्तव अपेक्षा करणे चुकीचेच. पण राहुल गांधी यांची भलामण करत फिरणारे आणि त्यांचे नेतृत्व स्विकारणाऱ्या ‘विद्वानांचे’ काय? हा प्रश्न उद्भवतो. यात अगदी यूपीए म्हणून २०१९ साली राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारलेल्या पक्षांपासून ते आत्ता आत्ता काँग्रेससोबत नवा संसार थाटणार्‍या शिवसेनेपर्यंत सर्वांचा समावेश होतो.

संजय राऊत यांनी नुकतेच एका वाहिनीवर बोलताना असे सांगितले की राहुल गांधीं सोबत त्यांची चांगली मैत्री आहे. अनेकदा त्यांच्यात विविध राजकीय विषयांवर चर्चा होत असते. अनेकदा भेटी होत असतात. राहुल गांधी आणि संजय राऊत यांचे बंध हे चांगलेच जुळलेले दिसतात. बहुदा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात राऊतांना साम्य दिसले असावे. म्हणूनच मैत्र लवकर जुळले. पण हा दोस्ताना किती काळ टीकतो हे बघावे लागेल. काँग्रेसच्या दावणीला बांधलेले कथित पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते हे देखील यात मोडतात. ही मंडळी राहुल गांधीमध्ये नेमके कोणते नेतृत्वगुण पाहतात हा खरंच संशोधनाचा विषय आहे.

हा तसं एक मान्य करावे लागेल की राहुल गांधी हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. पण त्यांची दिशा मात्र नेहमी चुकीची असते. ते स्वतः बुडतात आणि आपल्या इतर साथीदारांनाही बुडवतात. २०१९ ची लोकसभा निवडणूक हे त्याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणता येईल. २०१९ साली राहुल गांधींच्या नादाला लागून विरोधकांनी आपल्या प्रचाराचा फोकस हा राफेलच्या कथित घोटाळ्यावर ठेवला. अगदी २०१७-१८ पासूनच बेंबीच्या देठापासून ‘चौकीदार चोर है’ असे बोंबलत कॅम्पेन चालवले गेले. पण परिणाम काय झाला? नरेंद्र मोदी हे २०१४ पेक्षा अधिक जागा घेऊन निवडून आले. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनाच ‘चौकीदार चोर है’ म्हणण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार माफी मागावी लागली.

त्या आधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही तेच पाहायला मिळाले. २०१२ साली अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी २२४ जागी निवडून येत सत्तेत होती. २०१७ साली त्यांना राहुल गांधींसोबत जाण्याची दुर्बुद्धी झाली. २८ जागा लढवणारी काँग्रेस स्वतः ७५ टक्के जागांवर पराभूत झाली. जेमतेम सात जागा त्यांच्या निवडून आल्या. पण काँग्रेसचा हाच हात सायकलचीही काढून गेला. २२४ आमदारांटे संख्याबळ घेऊन सत्तेत असणारा समाजवादी पक्ष ५० जागाही टिकू शकला नाही. तर दुसरीकडे भाजपा ३०० पेक्षा अधिक जागांवर घवघवीत यश मिळवून सत्तेत आला.

हा राहुल गांधी यांचा करिष्मा आहे आणि तो इतक्यात संपेल असे वाटत नाही. २०२४ साली राहुल गांधी हेच विरोधकांचे नेतृत्व करतील असे दिसत आहे. तेव्हा राफेलची जागा कदाचित पेगॅसस सारख्या विषयांनी घेतली असेल. त्याला शेतकरी आंदोलनासारख्या विषयांची फोडणीही दिली जाईल. पण अंतिम परिणाम तोच असेल. विरोधकांचा राजकीय कडेलोट झाला असेल आणि धक्का देणारा हात हा राहुल गांधींचा असेल.

Exit mobile version