‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’

सीतारामन यांनी सुनावले

‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे ‘राजकारण’ केल्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केली. सन २०१६मध्ये हैदराबाद विद्यापीठात डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूचा मुद्दा संसदेत उचलून आणि रस्त्यावर निदर्शने करून त्याचा राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. ते पुण्यातील संपादकांशी बोलत होते.

काँग्रेसशासित राज्याच्या पोलिसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात शुक्रवारी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनुसार, वेमुला दलित नव्हता आणि त्याची खरी जातीय ओळख उघड होईल, या भीतीने तो नैराश्यग्रस्त होता आणि त्यातूनच त्याने आत्महत्या केली, असे नमूद करण्यात आले आहे.

वेमुलाच्या आत्महत्येने शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभावाबाबत देशभरात चळवळ उभी राहिली होती. तथापि, ६० पानांच्या क्लोजर रिपोर्टमुळे सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय वाद निर्माण झाला. त्यानंतर राज्य पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याचे जाहीर केले. ‘वेमुलाच्या मृत्यूचा गैरफायदा घेतल्याबद्दल राहुल गांधींनी संपूर्ण अनुसूचित जाती समुदायासमोर उभे राहून माफी मागितली पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया सीतारामन यांनी दिली. या अहवालात पुराव्याअभावी-भाजप नेत्यांसह सर्व आरोपींना तसेच, पक्षाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेला क्लीन चिट देण्यात आली.

हे ही वाचा:

तमिळनाडूमध्ये काँग्रेसनेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह

अपहरणप्रकरणी आमदार एचडी रेवण्णा यांना वडील देवेगौडा यांच्या घरातून अटक

किराणा दुकानात विकत होता ड्रग्ज; पोलिसांकडून ४ कोटी ५० लाख ७० हजारांचे ड्रग्ज जप्त

सलमान खान हल्ला प्रकरणी आरोपीच्या आत्महत्येबाबत कुटूंबीय न्यायालयात

‘दलित समाजाचा मुद्दा बनवून, राहुल गांधींनी विषाच्या दुकानाचा प्रचार केला,’ असे बोलून सीतारामन यांनी राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान वापरलेल्या ‘मोहब्बत की दुकान’ या संकल्पनेचा समाचार घेतला.
तेलंगणचा सत्ताधारी काँग्रेस पक्ष सन २०१६मध्ये राहुल गांधींसह सार्वजनिकपणे वेमुला कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला होता. राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात वेमुलाची आई राधिका यांच्यासोबत फिरले होते. ‘असहिष्णुता, राजकीय हस्तक्षेप आणि द्वेष हे सरकारमध्ये नसून निहित स्वार्थी गटांमध्ये आहेत, जे उच्च शिक्षणाच्या केंद्रांमध्ये हे विष पेरण्याची एकही संधी सोडत नाहीत,’ असे सीतारामन म्हणाल्या. रोहित वेमुला यांच्या प्रतिष्ठेचा आदर केलाच पाहिजे, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

Exit mobile version