काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात पत्रकार परिषद घेतली. २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत घडलेल्या भयानक हिंसाचार नंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि कृषी कायद्यांवर निशाणा साधला आहे.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राहुल गांधींनी आंदोलक शेतकऱ्यांना समर्थन दर्शवले असून शेतकऱ्यांना मागे न हटण्याचे आवाहन केले आहे. “मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनी आता मागे हटू नये. काहीही झाले तरी तुम्ही माघार घेऊ नका. तुम्ही लढा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमची सर्व मदत करू.” असे राहुल गांधींनी म्हंटले आहे.
याच पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना “विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर घातला कारण राष्ट्रपतींच्या भषणाला उपस्थित राहणे आम्हाला महत्वाचे वाटले नाही.” असे धक्कादायक विधान राहुल गांधींनी केले आहे. आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून प्रथेप्रमाणे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. पण काँग्रेस समवेत इतर १६ पक्षांनी या अभिभाषणावर बहिष्कार घातला. यासाठी त्यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांचे कारण पुढे केले आहे.