काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून पहिल्या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, आरएएस यांना लक्ष्य केले तर दुसऱ्या दिवशी कॅलिफोर्निया येथील भाषणात त्यांनी भारतातील विरोधी पक्ष कसे दुबळे झालेत याचे दुःख अमेरिकेतील विद्यार्थ्यांसमोर सांगितले.
कॅलिफोर्निया येथील स्टॅनफर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर झालेल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, सहा महिन्यांपूर्वीच हे नाट्य सुरू झाले. आम्ही सध्या खूप संघर्ष करत आहोत. संपूर्ण विरोधी पक्षच संघर्ष करत आहेत. प्रचंड आर्थिक वर्चस्व आहे. संस्था ताब्यात घेण्यात आल्या आहेत. आमच्या देशात लोकशाहीसाठी संघर्ष करताना आम्हाला त्रास होत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, आमचा संघर्ष हा आमचाच आहे. पण इथे काही भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांच्याशी मला बोलायचे आहे. त्यांच्याशी माझे नाते आहे. हा माझा हक्क आहे.
हे ही वाचा:
शिवतीर्थ हा गप्पांचा फड का बनलाय?
कुस्तीगीरांच्या आखाड्यात उतरले राज ठाकरे
स्वीडन युरोपमधील पहिला ‘धूम्रमुक्त’ देश होणार
शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर चांदीची दिमाखदार पालखी
राहुल गांधी यांनी पेगॅससचा जुना मुद्दा पुन्हा उकरून काढला. सिलीकॉन व्हॅलीमधील नव्या दमाच्या तंत्रज्ञांशी बोलताना राहुल गांधी यांनी डाटाच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करताना म्हटले की, हॅलो, मिस्टर मोदी. माझा आयफोन टॅप होतो आहे. देशातील लोकांच्या माहितीच्या सुरक्षिततेबाबत नियम तयार करा. राहुल गांधी यांनी दावा केला की, जर तुमचा फोन टॅप करण्याचे ठरविण्यात आले असेल तर कुणीही थांबवू शकत नाही. तर तुम्ही त्याच्याशी संघर्ष करू शकत नाही. मी जे काम करतो त्याची सगळी माहिती सरकारसाठी उपलब्ध आहे.
राहुल गांधी यांनी भारत चीन मुद्द्यावर भाष्य केले. भारताला कुणी मागे ढकलू शकत नाही. जेव्हा राहुल गांधींना प्रश्न विचारला की, भारत आणि चीन यांच्यात पुढील दहा वर्षात कसे संबंध असतील, त्यावर राहुल गांधी यांनी चीनवर कोणताही आरोप न करता भारत या सगळ्यात कसा अडकला आहे, हेच सांगितले. ते म्हणाले की, चीनने आमचा काही भाग गिळंकृत केला आहे. त्यामुळे ते संबंध चांगले ठेवणे कठीण आहे.