काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आलेले आहेत. नाशिक येथे या दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित सभास्थळी राहुल गांधी यांचे भाषण झाले. त्याआधी त्यांचा स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पण त्यावेळी एका कार्यकर्त्यांने देऊ केलेली विठ्ठलाची मूर्ती राहुल गांधी यांनी स्वीकारताना टाळाटाळ केली असा व्हीडिओ समोर आल्याने राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली.
नाशिक येथील या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यावेळी हा सत्कार पार पडला. त्यादरम्यान एक कार्यकर्ता विठ्ठलाची मूर्ती घेऊन राहुल गांधींना ती देण्यासाठी पुढे आला. त्यावेळी राहुल गांधी यांना दुसरा एक कार्यकर्ता फेटा बांधत होता. त्याचवेळी त्या कार्यकर्त्याने विठ्ठलाची मूर्ती पुढे केली, पण फेटा बांधणाऱ्या कार्यकर्त्याने त्याला बाजुला होण्यास सांगितले. त्यानंतरही तो कार्यकर्ता विठ्ठलाची मूर्ती घेऊन पुढे येत होता. पण राहुल गांधी इतर कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या सत्कारात व्यस्त होते.
य़ासंदर्भातील व्हीडिओ आता व्हायरल होत असून त्यानिमित्ताने राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हीडिओ पाहिल्यानंतर त्यात राहुल गांधी यांना ही मूर्ती नंतर देण्यात आली मात्र ती स्वीकारतानाही राहुल गांधी अनुत्सुक दिसले. झटपट मूर्ती स्वीकारून त्यांनी ती मागे देऊन टाकली.
हे ही वाचा:
आठ वर्षांनी संपुष्टात आला मुंबई रणजी संघाचा दुष्काळ
पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच सक्षम!
पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी भाजपात!
शेजारच्यांकडे लिंबू मागणे कॉन्स्टेबलला पडले महागात!
एकूणच राहुल गांधी यांच्या देहबोलीवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. विठुराया हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, त्याबाबतीत असे दुर्लक्ष किंवा चालढकल कुणालाही पसंत पडणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा वाद निर्माण होतात. मागे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली होती, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यातून त्यांना महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल काही आस्था नाही अशी टीका केली जाऊ लागली. आता हा नवा वाद त्यांनी निर्माण केला आहे.