राहुल गांधींना ‘तपस्वी’ जाहीर करण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा; प्रभू श्रीरामाशीही तुलना

सलमान खुर्शीद यांच्याकडून वारेमाप स्तुतीसुमने

राहुल गांधींना ‘तपस्वी’ जाहीर करण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा; प्रभू श्रीरामाशीही तुलना

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा प्रचार करत आहेत. ही यात्रा आता दिल्लीत आली असून दिल्लीतील प्रचंड थंडी पाहता राहुल गांधी टी शर्टवर कसे काय फिरू शकतात, असे काँग्रेस नेते कौतुकाने बोलू लागले आहेत. ते जणू काही योगी आहेत, आपली तपस्या ते करत आहेत, अशा शब्दांत राहुल गांधींवर स्तुतीसुमने काँग्रेस नेत्यांकडून उधळली जात आहेत.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी हे सुपरह्युमन आहे. आम्ही दिल्लीत थंडीने कुडकुडत आहोत आणि जॅकेट घालून थंडीपासून स्वतःचे संरक्षण करत आहोत, तिथे राहुल गांधी मात्र टी शर्टवर फिरत आहेत. ते जणू काही योगीच आहेत आणि तपस्या करत आहेत.

हे ही वाचा:

भातखळकरांची टीका; राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विरोधकांचा खेळ

आदित्य, राष्ट्रवादीचा शेवाळे प्रकरणाशी काय संबंध?

पवारांचा वारकऱ्यांना संयमाचा सल्ला

सीमावर्ती बांधवाना वाऱ्यावर सोडणार नाही.. इंच इंच लढू

खुर्शीद यांनी आपल्या नेत्याचा गुणगौरव करण्यासाठी चक्क त्यांना प्रभू श्रीरामाची उपमाही दिली. राहुल गांधी उत्तर प्रदेशात भारत जोडो यात्रा घेऊन गेले नाहीत, यावर खुर्शीद म्हणतात की, रामजी जिकडे गेले नाहीत तिकडे त्यांच्या खडावा नेण्यात आल्या. त्याप्रमाणेच आम्ही आमच्या रामजींच्या (राहुल गांधी) खडावा उत्तर प्रदेशात नेऊ. आता या खडावा आम्ही उत्तर प्रदेशात नेल्या की ‘रामजी’ही तिथे येतील.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनीही आपल्या नेत्यावर स्तुतीसुमने उडविली आहेत. त्या म्हणतात की, राहुल गांधी टी शर्टवर या थंडीत वावरत आहेत, ते एकप्रकारे तपस्वीच आहेत. ६ डिग्री तापमानात कुणी टी शर्टवर कसे काय राहू शकतो, असा सवाल त्या उपस्थित करतात. असे आत्मनियंत्रण, आत्मबल हे तपस्वींचेच असते.

Exit mobile version