मोदी आडनावाच्या अवमानप्रकरणी राहुल गांधी यांना सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबत याचिकादार पूर्णेश मोदी यांचे वकील महेश जेठमलानी यांचे म्हणणे समोर आले आहे.
‘सर्वोच्च न्यायालयाने केवळ शिक्षेवर स्थगिती आणली आहे. सत्र न्यायालयाने राहुल गांधींना कमाल शिक्षा देण्यासाठी ठोस कारण दिलेले नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, कायद्याच्या लेखी ते अजूनही दोषी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे ते संसदेत परतू शकतात. परंतु सत्र न्यायालयाने दिलेली शिक्षा आणि दंड दोन्ही योग्य आहेत,’ असे महेश जेठमलानी यांनी सांगितले.
राहुल गांधी प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई कशी असेल, याबाबतही जेठमलानी यांनी प्रकाश टाकला. ‘सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावण्यासाठी सबळ कारण दिले नसल्याने आता पुन्हा सत्र न्यायालयात अर्ज केला जाईल,’ असे त्यांनी सांगितले. ‘जेव्हा केस चालू होईल, तेव्हा राहुल गांधी दोषी मानले जातील. मात्र त्यांना किती शिक्षा होईल, दोन वर्षांची की त्याहून कमी? किंवा त्यांना दंड लावला जाईल का, हे मी सांगू शकत नाही. मात्र पुरावे इतके मजबूत आहेत, की ते दोषी सिद्ध होण्यापासून वाचू शकत नाहीत,’ असेही जेठमलानी यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
कोविड घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
मणिपूरमध्ये जमावाने शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटला
एनआयएकडून अकिब नाचन याला पडघ्यातून अटक
कर्नाटकमधील कोलारमध्ये एका प्रचारसभेदरम्यान मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त टिपणी केल्याने राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. ‘सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे असते?’, असा प्रश्न त्यांनी सभेत केला होता. या प्रकरणात गुजरातमधील सत्र न्यायालयाने गांधी यांना दोषी ठरवल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली होती.