कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्या तासा दोन तासात आम्ही केलेली पाच आश्वासनांची पूर्तता करू असे म्हटले आहे.
राहुल गांधी या शपथविधी सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही आश्वासने पूर्ण करण्याचे नवे आश्वासन दिले.यावेळी भारत जोडो यात्रेमुळे द्वेष संपला आणि प्रेमाचा विजय झाला, अशीही टिप्पणी केली. कर्नाटकाने द्वेषाच्या बाजारात प्रेमाची अनेक दुकाने उघडल्याचेही ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही ५ आश्वासने आमच्या जाहीरनाम्यात दिली होती. आम्ही म्हणालो होतो की, आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जे बोलतो ते करतो. कर्नाटक सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत ५ आश्वासने ही कायद्यात रूपांतरित होतील.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही गरीब, दलित, मागासवर्गीयांसाठी काम केले म्हणून इथे जिंकू शकलो. गेल्या पाच वर्षात अनेक अडचणींचा सामना जनतेला करावा लागला. मीडियात लिहिले गेले की, काँग्रेसचा विजय कसा झाला पण गरिबांसाठी केलेल्या कामामुळे हा विजय झालेला आहे.
हे ही वाचा:
निदर्शनादरम्यान पोलिसांची हत्या करणाऱ्या तिघांना इराणमध्ये फाशी
केरळ स्टोरीने ‘छत्रपती’ आणि ‘पीएस २’ अशा चित्रपटांना टाकले मागे !
यशस्वी जयस्वालला आता रोखता कामा नये!
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची काय आहेत कारणे?
दरम्यान, सिद्धरामय्या यांनी आपले सहकारी डी. के. शिवकुमार यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण मंत्रिमंडळ होत असतानाच काँग्रेसने उदयपूर येथील चिंतन शिबिरात एक पद एक तिकीट हे तत्त्व अंगिकारले होते, त्याचा त्यांना विसर पडला आहे का, याची चर्चा सुरू झाली. कारण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांना मंत्रीपद सोपविण्यात आले आहे. प्रियांक यांच्यासह आणखी सात जणांनीही शपथ घेतली. त्यात डॉ. परमेश्वर, के.एच. मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, सतीश जारकीहोळी, रामलिंग रेड्डी, बी.झेड. जमी अहमद खान यांचाही समावेश आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मैदानात उतरण्याचे ठरविले होते. पण एक पद एक तिकीट असे तत्त्व असल्यामुळे त्यांनी त्यातून माघार घेत मुख्यमंत्रीपद हे एकमेव पद ठेवले. पण काँग्रेसने या आपल्या तत्त्वाला मुरड घालताना एक मार्ग काढला आहे. तो म्हणजे जर एखादा नेता पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा करत असेल तर त्याला पद दिले जाऊ शकते. या उपाययोजनेमुळे आता अनेक मोठ्या नेत्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे खरगे यांच्या मुलाला मंत्रिपद मिळाले आहे, असे म्हटले जाते.
भाजपाने काँग्रेसवर सातत्याने कुटुंबवादाचा आरोप केला आहे. आता खरगे यांच्या मुलाला मंत्रिपद दिल्याने भाजपाला तशी संधी पुन्हा मिळाली आहे, असे म्हटले जात आहे.