भाजप नेते आणि माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘सर्वांत मोठा शेअर बाजार घोटाळा’ या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. ‘राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’चा झालेला पराभव सहन करण्यास असमर्थ ठरल्यामुळे ते अशी टिप्पणी करत आहेत,’ असा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे मतमोजणीपूर्वी शेअर बाजारात तेजी आली आणि निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कोसळला, त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. हा सर्वांत मोठा शेअर बाजार घोटाळा” असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी चौकशीची मागणी केली.
त्यावर उत्तर देताना गोयल म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या झालेल्या पराभवातून राहुल गांधी सावरू शकलेले नाहीत, असे दिसते. आता ते बाजारातील गुंतवणूकदारांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. संपूर्ण जग स्वीकारते की ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, या काळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री यांनी नमूद केले की, एक्झिट पोलनंतर, परदेशी गुंतवणूकदारांनी उच्च दराने समभागांची खरेदी केली तर भारतीय गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा वसूल केला. गोयल यांनी राहुल गांधींवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला. ‘यूपीए सरकारच्या काळात ६७ लाख कोटी रुपये असलेले भारताचे बाजार भांडवल आता ४१५ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. देशांतर्गत आणि किरकोळ गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
विशालने विझवली मशाल, खर्गेंना दिले पाठिंब्याचे पत्र!
जेडीयूचा ‘एक राष्ट्र, एक मतदान’ आणि समान नागरी कायद्याला पाठिंबा!
निरपराध शेळीला मारण्यापेक्षा द्रमुक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे यायला हवे होते !
भाजप सरकारच्या काळात शेअर बाजाराने जोरदार मुसंडी मारल्याचा दावा गोयल यांनी केला. ‘मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच आमच्या बाजार भांडवलाने ५ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. आज भारताच्या इक्विटी मार्केटने जगातील पाच आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये प्रवेश केला आहे. मोदी सरकारच्या काळात बाजारात सूचीबद्ध पीएसयूंचे (पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग) बाजार भांडवल चार पटींनी वाढले आहे,’ अशी माहिती गोयल यांनी दिली.