राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती, खासदारकी परत मिळणार

निर्णयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विविध ठिकाणी जल्लोष

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती, खासदारकी परत मिळणार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी करण्यात आलेल्या २ वर्षांच्या शिक्षेवर स्थगिती लावण्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला. त्यामुळे राहुल गांधींना दिलासा मिळाला असून त्यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळणार आहे, असे म्हटले जात आहे. या निर्णयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जल्लोष करत याचा आनंद साजरा केला आहे.

 

मोदी नावाचे सगळेच कसे चोर असतात असे विधान राहुल गांधी यांनी भाषणात केले होते. त्यावरून भाजपाचे आमदार पूर्णेश मोदी यांनी न्यायालयात धाव घेत राहुल गांधी यांनी मोदी समाजाची बदनामी केली आहे, असा आरोप केला. त्यावरून गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

 

 

गांधी यांच्यावतीने युक्तिवाद करताना अभिषेक मनु संघवी यांनी म्हटले की, राहुल गांधींवर जो आरोप आहे तो काही अपहरण, बलात्कार अथवा खुनाचा नाही. त्यात जास्तीत जास्त शिक्षा दिली जाते. ही दोन वर्षांची सर्वाधिक शिक्षा देण्यामागचा उद्देश त्यांना आठ वर्षांसाठी अपात्र करणे हा असला पाहिजे. शिवाय, यापूर्वी राहुल गांधी यांच्याविरोधात असे कोणतेही प्रकरण नाही. सर्वोच्च न्यायालयात एक बदनामीचा खटला आहे. त्यात त्यांनी माफी मागितलेली आहे. राहुल गांधी हे काही निर्ढावलेले गुन्हेगार नाहीत. राजकारणात एकमेकांप्रती आदर असला पाहिजे.

 

 

संघवी असेही म्हणाले की, या शिक्षेमुळे वायनाड या त्यांच्या मतदारसंघात पोट निवडणूक घ्यावी लागली असती. राहुल गांधी यांना यापूर्वीच लोकसभेची दोन सत्र गमवावी लागली आहेत. आणखी एक सत्र गमवावे लागले तर संपूर्ण एक वर्ष त्यांचे वाया जाईल. राहुल गांधी अपात्र व्हावेत असे तक्रारदाराला का वाटते? न्यायाधीश बीआर गवई, पीएस नरसिंहा व संजय कुमार यांच्या पीठासमोर हे प्रकरण चालले.

 

 

यासंदर्भात तक्रारदार पूर्णेश मोदी यांच्यावतीने महेश जेठमलानी यानी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, गांधी यांच्या भाषणाचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. ज्याने हे भाषण ऐकले त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. जेठमलानी यांनी राहुल गांधी यांच्या भाषणातील तो उल्लेखही उद्धृत केला. त्यात राहुल गांधी म्हणतात की, अच्छा एक छोटा सा सवाल. इन सब चोरोंका नाम मोदी, मोदी कैसे है…ललित मोदी, निरव मोदी और थोडा ढुंढोगे तो और सारे मोदी निकल आएंगे.

हे ही वाचा:

एकाच वेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो नाचवणे हा योगायोग नाही

इस्रायलचे ‘स्पाईक’ वाढवणार भारतीय वायूदलाची ताकद!

अमित शहा लोकसभेत पंडित नेहरूंबद्दल बोलले…विरोधक झाले निरुत्तर!

२००व्या टी-२० सामन्यात भारत वेस्ट इंडिजकडून पराभूत

 

जेठमलानी म्हणाले की, संपूर्ण मोदी समाजाला बदनाम करणे हाच राहुल गांधी यांचा उद्देश होता. याचे कारण म्हणजे पंतप्रधानांचे नाव मोदी आहे, त्यातूनच त्यांनी ही बदनामी केलेली आहे. पण राहुल गांधी यांनी मात्र आपल्याला असे काही बोलल्याचे आठवत नाही, असे विधान केले होते. या शिक्षेला स्थगिती मिळविणे म्हणजे मागल्या दाराने पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे. या शिक्षेमुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघातील लोकांवर अन्याय होईल हा खरोखरच महत्त्वाचा मुद्दा आहे का? असा सवाल न्यायाधीश गवई यांनी विचारल्यावर जेठमलानी यांनी त्याला होकार दिला.

 

 

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खालच्या कोर्टावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करू नये. उलट काहीवेळा सर्वोच्च न्यायालय खालच्या न्यायालयांवर ताशेरे ओढत असते की, त्यांनी पुरेशी कारणे दिली नाहीत.

 

 

राहुल गांधी, प्रियांका वड्रांकडून स्वागत

 

यासंदर्भात राहुल गांधी यांनी सत्यमेव जयते, जयहिंद असे ट्विट करत आपल्याला न्याय मिळाल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका वड्रा यांनी गौतम बुद्धांचा संदेश उद्धृत केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सूर्य, चंद्र आणि सत्य हे कधी लपत नाही. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद.

Exit mobile version