राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती पक्षाचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी दिली.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हंगामी लोकसभाध्यक्ष भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील, अशी माहिती दिली असल्याचे वेणुगोपाल यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे राहुल गांधी हे गांधी कुटुंबातील तिसरे सदस्य असतील. त्यांच्या आधी त्यांचे आई-वडील सोनिया आणि राजीव गांधी यांनी ही पदे भूषवली होती. ९ जून रोजी, पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी समिती असणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणी समितीने (सीडब्लूसी) राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्याचा ठराव मंजूर केला होता. या बैठकीनंतर, राहुल गांधी यांनी निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचे सांगितले होते.

काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद स्वत:साठी पुन्हा मिळवले आहे. सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने २०१९मधील ५२ जागांवरून ९९ जागा मिळवून संख्याबळ दुप्पट केले आहे. सन २०१४च्या निवडणुकीत पक्षाला अवघ्या ४४ जागा जिंकता आल्या होत्या.

हे ही वाचा:

जामीन मिळाला असला तरीही दोषीवर कारवाई करणारच !

पवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!

“के सुरेश यांना नामनिर्देशित करणं हा काँग्रेसचा एकतर्फी निर्णय”

गावबंदीची उठाठेव कशाला? ओबीसींचे आंदोलन ‘जरांगे’ मार्गाने जायला नको…

सन २०१४ आणि २०१९मध्ये भाजप नंतर संसदेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही, काँग्रेस हा मुख्य विरोधी पक्ष म्हणून सभागृहातील निकष पूर्ण करू शकला नाही. ज्या पक्षाला १० टक्क्यांपेक्षा कमी जागा आहेत, तो कनिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकत नाही. आदल्या दिवशी राहुल गांधी यांनी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन ‘जय हिंद, जय संविधान’ असे म्हटले होते.

Exit mobile version