प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांचा दावा
प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताची राजधानी दिल्लीतील कुतुबमिनारजवळच्या कुवत उल इस्लाम या मशिदीच्या उभारणीसाठी २७ मंदिरांची तोडफोड करण्यात आली होती.
दिल्ली पर्यटन विभागाच्या वेबसाईटनुसार दिल्लीतील हिंदूंची राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर तिथे ७३ मीटरचा कुतुबमिनार २७ हिंदू मंदिरांच्या अवशेषांपासून बनविण्यात आला. कुवत उल इस्लाम या मशिदीच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असलेल्या लिखाणावरून २७ मंदिरे उद्ध्वस्त करून त्यानंतर ही मशिद उभी केली गेल्याचे म्हटले आहे.
दिल्लीतील पहिला मुस्लिम राज्यकर्ता कुतुबुद्दीन ऐबक याने कुतुबमिनारची उभारणी १२०० मध्ये सुरू केली पण केवळ तळाचा भागच उभारला गेला. त्याचा वारसदार इल्तमश याने हा मिनार आणखी वाढविला. त्याच्या काळात तीन मजले उभारण्यात आले. त्यानंतर फिरोजशहा तुघलकने पाचवा आणि शेवटचा मजला बांधला, असे वेबसाईटने म्हटले आहे.
मोहम्मद यांनी याबाबत म्हटले आहे की, याठिकाणी एकच नव्हेतर श्रीगणेशाच्या अनेक मूर्ती आहेत. ही पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती. तिथे २७ हिंदू मंदिरे होती. तिथे अरेबियन भाषेत हेही लिहिले आहे की, ही मशिद उभारण्यासाठी तिथे २७ मंदिरे तोडण्यात आली होती.
हे ही वाचा:
दिल्लीत मास्कसक्ती, मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड
कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
सदावर्तेंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा
भारताची भूमिका कौतुकास्पद; रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी केले कौतुक
मोहम्मद हे दिल्ली स्कूल ऑफ आर्किओलॉजीच्या पथकातील एक असून अयोध्येतील उत्खननात प्रा. व्ही. बी. पाल यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. तिथेही मंदिरांचे खांब, दगड वापरून मशिदीची उभारणी केल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. सध्या कुतुबमिनारचे हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात आहे. कुतुब मिनारमध्ये असलेल्या श्रीगणेशाच्या मूर्ती काढू नयेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
तिर्थंकर ऋषभ देव यांच्यावतीने ऍड. हरिशंकर जैन यांनी ही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली असून त्यात २७ मंदिरांची तोडफोड करून त्यांच्या अवशेषांचा वापर ही मशिद उभारण्यासाठी केला गेल्याचे म्हटले आहे. मोहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबकने हे कृत्य केल्याचा उल्लेखही त्यांनी याचिकेत केला आहे. श्रीगणेशाच्या दोन मूर्ती तिथे आहेत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेनेही यासंदर्भात आपली भूमिका मांडली असून तिथे असलेली प्राचीन देवळे पुन्हा उभारली गेली पाहिजेत आणि तिथे प्रार्थना पुन्हा सुरू व्हायला हव्यात अशी मागणीही केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी याठिकाणी भेट देत हिंदू देवीदेवतांच्या मूर्तींची अवस्था वाईट असल्याचे त्यांना आढळले.