कॅनडामध्ये सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून कॅनडाच्या अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांनी अचानक राजीनामा दिल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. पुढील वर्षी कॅनडामध्ये निवडणुका होणार असून यापूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी राजीनामा देताना जस्टिन ट्रुडो यांना कमकुवत असल्याचे म्हटले आहे. फ्रीलँड या ट्रुडोच्या जवळच्या मानल्या जात होत्या. त्यामुळे फ्रीलँड यांच्या राजीनाम्यानंतर जस्टिन ट्रुडो यांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी ट्रुड्रो यांच्याकडे पंतप्रधान पद सोडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, जस्टिन ट्रुडो हे पुढच्या निवडणुकीतही लिबरल पक्षाचे नेतृत्व करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्याचं पक्षात असे अनेक नेते आहे ज्यांना जस्टिन ट्रुडो यांनी यावेळी नेतृत्व करू नये असे वाटते. ट्रुड्रो यांना सलग चौथ्यांदा पंतप्रधान व्हायचे आहे, पण पक्षांतर्गत निर्माण झालेल्या आव्हानांमुळे त्यांच्यापुढे संकट देखील आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे म्हणाले की, सरकार आता आपले नियंत्रण गमावत आहे. ही सरकारची सर्वात वाईट वेळ आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या हातातून सरकार निसटत आहे, पण तरीही त्यांना कायम राहायचे आहे. ही संकटाची परिस्थिती अशा वेळी आहे जेव्हा अमेरिका आमच्यावर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लादत आहे. अशा स्थितीत कमकुवत सरकार देशाची धोरणे कशी पुढे नेणार?
हे ही वाचा :
संभल येथे सापडलेल्या मंदिरामागील अनधिकृत बांधकाम पाडायला सुरुवात
‘पॅलेस्टाईन’ बॅग घेणाऱ्या प्रियांका वाड्रांवर पाकिस्तान खुश!
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्लानंतर तृणमूलही काँग्रेसविरोधात
पुढील वर्षी ऑक्टोबरपूर्वी कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लिबरल पक्षाला सत्तेत राहण्यासाठी किमान एका पक्षाचा पाठिंबा आवश्यक आहे. कारण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. न्यू डेमोक्रॅटिक पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यास कॅनडात कधीही निवडणुका होऊ शकतात. कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांचे आगमन आणि राहणीमानाच्या किंमती वाढल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.