महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजेंद्र गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.

महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर अवघ्या काही तासांतच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी राजेंद्र गुढा यांची राज्यमंत्रिपदावरून हकालपट्टी केली. राजेंद्र गुढा यांच्याकडे सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), गृहरक्षक आणि नागरी संरक्षण, पंचायती राज आणि ग्रामीण विकास राज्यमंत्रिपदाचा कार्यभार आहे.

राजस्थानच्या विधानसभेत राजस्थान किमान उत्पन्न हमी विधेयक २०२३ यावर चर्चा होणार होती. मात्र, मणिपूरमधील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेबद्दल सत्ताधारी काँग्रेसच्याच आमदारांनी निषेधाचे फलक फडकवले. त्यामुळे चर्चेमध्ये अडथळा निर्माण झाला. त्यानंतर गुढा यांनी महिलांना सुरक्षा देण्याच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केले.

‘राजस्थानमध्ये ज्या प्रकारे महिलांना सुरक्षा देण्यात ज्या प्रकारे आपण अपयशी ठरलो आहोत आणि महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत आपण मणिपूरचा मुद्दा उपस्थित करण्याऐवजी आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे,’ असे राजेंद्र गुढा म्हणाले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.

हे ही वाचा:

इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांची संख्या २२ वर, शोधकार्य सुरू

देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार

पश्चिम बंगालमध्येही भाजप उमेदवाराची नग्न धिंड काढली होती, त्याचे काय?

फोगाट, बजरंग निवडीसंदर्भात शनिवारी न्यायालय देणार निर्णय

गुढा यांच्या या वक्तव्याने राजस्थानमधील विरोधी पक्ष भाजपला आयते कोलित मिळाले आणि त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला लक्ष्य केले. ‘राजस्थानमधील लेकी- बहिणींवर होणाऱ्या अत्याचाराचे सत्य स्वत: सरकारचे मंत्री राजेंद्र गुढा सांगत आहेत,’ असे ट्वीट विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि भाजपचे आमदार राजेंद्र राठोड यांनी केले.

Exit mobile version