वडेट्टीवार यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर पाय देणे लज्जास्पद

वडेट्टीवार यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर पाय देणे लज्जास्पद

‘छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, विजय वडेट्टीवार यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर पाय देणे हे अत्यंत अपमानास्पद आणि लज्जास्पद आहे’ असे मत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. सोमवार, २७ डिसेंबर रोजी माध्यमांशी बोलताना पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी मंत्र्यांनी काळजी घ्यायला हवी असे म्हटले आहे.

कर्नाटकात कॉंग्रेस कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना ताजी आहे. अशातच आता महाराष्ट्रातून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचे समोर येत आहे. राज्य सरकार मधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर चढून त्याला हार घालण्याचे कृत्य केले आहे. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगला फिरत आहे. या व्हिडिओमध्ये वडेट्टीवार पाठमोरे उभे असून ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पुतळ्याची उंची जास्त असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाहीये. अशावेळी ते थेट पुतळ्यावर चढवून पुतळ्याला हार घालताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

यावरूनच राज्यातील भाजपा नेते आक्रमक झाले असून त्यांनी वडेट्टीवारांना लक्ष्य केले आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना वडेट्टीवारांवर टीकास्त्र डागले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही आणि त्याचा निषेध व्हायलाच हवा असे सांगताना चंद्रकांत पाटील यांनी पुतळे बनवताना आणि त्यांना हार घालताना ही सर्व प्रकारची काळजी घ्यायला हवी असे म्हटले आहे. पुतळ्याची उंची किती होती? त्यानुसार हार घालताना त्याला तेव्हा शिडी वगैरे आहे का? याची पूर्ण ती खबरदारी घ्यायला हवी असे चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे. हे अशा प्रकारे जेव्हा शिवरायांचा अपमान होतो तेव्हा हेतू तसा नसतो. जर अपमान करायचा असता तर कोणी हार घालायला का जाईल? असा सवालही चंद्रकांत दादा पाटील यांनी केला आहे. पण त्याच वेळी हार घालताना काळजी घेणे आवश्यक आहे असे पाटील म्हणाले.

Exit mobile version