पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंड राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत शनिवार, ३ जुलै रोजी पार पडलेल्या उत्तराखंड मधील भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीत धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे त्यामुळे आता एक युवा चेहरा उत्तराखंड राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभणार आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी शुक्रवार, २ जुलै रोजी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. राज्यात संविधानात पेचप्रसंग उद्भवू नये यासाठी तिरथ सिंह रावत यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. यावेळी असे सांगण्यात आले की शनिवार भाजपाच्या विधिमंडळ गटाची बैठक होणार असून या बैठकीत पुढील मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाईल.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स
रावत यांनी मोडला कोश्यारींचा विक्रम
तुम्हाला खुर्ची उबवायला दिली आहे काय?
त्याप्रमाणेच शनिवारच्या बैठकीत धामी यांचे नाव पुढे आले असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यावेळी धामी यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळ दलाचा नेता म्हणून करण्यात आली आहे. पुष्कर सिंह धामी हे आतापर्यंत दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कुंमाव परिसरातील खटीमा मतदार संघाचे धामी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या युवक आघाडीचे उत्तराखंड राज्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम बघितले आहे.
धामी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाचे, पक्ष नेतृत्वाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘पार्टीने एका सामान्य कार्यकर्त्याला मोठी जबाबदारी सोपवली आहे’ अशी प्रतिक्रिया धामी यांनी दिली आहे. ‘हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान असणार आहे, पण मी माझ्या पक्षासोबत काम करून नागरिकांना दिलेली वचने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आमच्या पक्षाच्या सरकारने आजवर केलेले चांगले काम असेच पुढे नेण्याचा प्रयत्न करेन असे धामी यांनी म्हटले आहे.