भारतीय जनता पार्टीचे नेते पुष्कर सिंह धामी यांनी आज देवभूमी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पुष्कर सिंह धामी हे दुसऱ्यांदा उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. डेहराडून येथील परेड ग्राउंड वर हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सर्व नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे
तर यांच्यासह इतर अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासहीत भाजपाचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. तर देवभूमीतील अनेक धर्मगुरूंनीही या सोहळ्याला हजेरी लावली आहे.
हे ही वाचा:
पाटणकर प्रकरणातल्या पुष्पक बुलियनने नोटाबंदीत केली २८५ किलो सोने खरेदी
तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं
‘उ. प्रदेशमधील पराभवासाठी प्रियांका गांधींचा राजीनामा घ्या’
‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’
उत्तराखंडचे राज्यपाल ले. जनरल गुरमीत सिंह (निवृत्त) यांनी पुष्कर सिंह धामी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांना शपथ दिली आहे. पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. तर त्यांच्या सोबत सतपाल महाराज, प्रेम चंद अग्रवाल, गणेश जोशी, धन सिंह रावत, रेखा आर्या, सुबोध उनियाल, चंदन रामदास, सौरभ बहुगुणा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत धामी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण असे असले तरीही त्यांचा चेहरा पुढे करूनच भाजपाने देवभूमीतील सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. संविधानिक तरतुदीनुसार पुढल्या सहा महिन्यात धामी यांना आमदार म्हणून निवडून येणे बंधनकारक असणार आहे.