ओडिशा सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ पुरीमध्ये बांधण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. जगन्नाथाच्या भाविकांना या विमानतळाचा लाभ होणार आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
ओडीशा सरकारने विमानतळासाठी जागेची निवडली केली आहे. याशिवाय विमानतळ बांधण्याकरिता राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल. मी नागरी विमान मंत्रालयाला या शहरात लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा करावा अशी विनंती करतो, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रात जगन्नाथपुरी हे आध्यात्मिक पर्यटनाचे आणि आर्थिक विकासाचे मोठे केंद्र होऊ शकते, असा आमचा विश्वास पटनायक यांनी व्यक्त केला आहे. पुरीची रथयात्रा जगप्रसिध्द असून भारतासह १९२ देशात ही रथयात्रा काढली जाते. लाखो भाविकांसाठी हा एक मोठा उत्सव असतो. या विमानतळामुळे अनेक भाविकांची सोय होणार आहे. तसेच या विमानतळामुळे जगन्नाथपुरीतील आध्यात्मिक संस्कृती जगभरात पोहोचायला मदत होईल. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ लवकरात लवकर तयार करून त्याला ‘श्री जगन्नाथ आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्यावे, हे ही नवीन पटनायक यांनी सुचवले आहे.
हिंदू संस्कृतीत जगन्नाथाच्या रथयात्रेचे मोठे महत्त्व आहे. श्री जगन्नाथ हे लक्षावधी हिंदूंचे श्रध्दास्थान आहे. त्याबरोबरच ओडिशामधील चिलीका सरोवर भितरकर्णीका राष्ट्रीय उद्यान या दोन्ही रामसार स्थळे आहेत. याशिवाय पुरीच्या समुद्रकिनाऱ्याला नुकताच ब्ल्यु फ्लॅग मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे हा समुद्रकिनारा पर्यटनाचे प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळे या भागात पर्यटनाचे मोठे केंद्र निर्माण केले जाऊ शकते असा विश्वास पटनायक यांनी व्यक्त केला आहे.
पर्यटन केंद्राबरोबरच पारादीप बंदर आणि अस्तरंग बंदर पुरीशी जोडून घेता येईल, असे पटनायक यांनी यावेळी सांगितले.