पंजाबच्या पतियाळा येथे खलिस्तान मुर्दाबादचे नारे देणाऱ्या शिवसेनेचा नेता हरिश सिंगला यांचीच हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेनेकडून उचलण्यात आलेले हे पाऊल आश्चर्यजनक मानले जात आहे.
खलिस्तान चळवळीचा नेता गुरपतवंत पन्नू याने खलिस्तान स्थापना दिवसाच्या अनुषंगान रॅलीचे आयोजन केले होते. पण त्याला पंजाबमधील शिवसेनेने विरोध करत खलिस्तान मुर्दाबादचे नारे देत रॅली काढली. त्यातून पतियाळात धुमश्चक्री उडाली. दगडफेक, तलवारी घेऊन धावणारे लोक, दोन्ही गटात शाब्दिक चकमकी असे वातावरण दिसू लागले. शिवसेनेने खलिस्तान मुर्दाबाद रॅलीचे पतियाळातील माँ काली मंदिरापर्यंत आयोजन केले होते.
सिंगला यांनी या रॅलीचे आयोजन केले होते. पण खलिस्तानची बाजू घेणाऱ्यांनी या रॅलीला विरोध दर्शविला. त्यातून वातावरण बिघडले.
तेव्हा शिवसेनेचे पंजाबमधील प्रमुख योगराज शर्मा यांनी खलिस्तान मुर्दाबाद रॅलीला आपले समर्थन नसल्याचे म्हटले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अनिल देसाई यांच्या सूचनेवरून सिंगला याची हकालपट्टी करण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले.
पतियाळात खलिस्तानविरोधी जी रॅली शिवसेनेतर्फे काढण्यात आली, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. सिंगला यांनी वैयक्तिक ती रॅली काढली होती. आम्ही पोलिसांना आधीच सांगितले होते की, या रॅलीशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही. सिंगला यांचा हा वैयक्तिक कार्यक्रम होता.
हे ही वाचा:
तुरूंगातून मलिकांचा मंत्रिमंडळ निर्णय, निलेश राणेंची टीका
ऑइल बॉण्डमुळे पेट्रोल वाढीचे चटके
तुरूंगातून मलिकांचा मंत्रिमंडळ निर्णय, निलेश राणेंची टीका
धुळ्यापाठोपाठ आता नांदेडमध्येही तलवारी पकडल्या
१० दिवसांपूर्वीच आम्ही पोलिसांना सांगितले होते की, या रॅलीशी आमचा संबंध नसून आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही.
पण पोलिसांनीही हा खलिस्तान विरोधी मोर्चा अडविला नाही, असेही शर्मा म्हणाले. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सिंगला यांना पक्षातून काढून टाकण्याचे आदेश आम्हाला वरिष्ठांकडून मिळालेले आहेत. त्यानुसार आम्ही त्याची हकालपट्टी केलेली आहे.
यावर सिंगला म्हणाले की, मला पक्षातून काढण्याचा शर्मा यांना अधिकार नाही. माझ्यासारख्या वरिष्ठ नेत्याला ते पक्षातून काढू शकत नाहीत. खलिस्तानच्या समर्थनार्थ उतरलेल्या लोकांचा विरोध करण्यासाठीच आम्ही रॅली काढली होती.