क्रांतिकारक सुखदेव यांचे वंशज, पंजाब शिवसेनेचे नेते थापर यांच्यावर प्राणघातक हल्ला

तलवारधारी निहंग शिखांनी केले वार

क्रांतिकारक सुखदेव यांचे वंशज, पंजाब शिवसेनेचे नेते थापर यांच्यावर प्राणघातक हल्ला

भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले ते क्रांतिकारक सुखदेव यांचे वंशज आणि पंजाब शिवसेनेचे नेते ५८ वर्षीय संदीप थापर यांच्यावर पंजाबमध्ये निहंग शिखांकडून तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्र अरोरा यांच्या चौथ्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आटोपून थापर हे स्कूटरवरून निघालेले असताना या निहंगांनी त्यांना गाठले. संवेदना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या अरोरांच्या या संस्थेच्या माध्यमातून रुग्णांना मोफत रुग्णवाहिका व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

पोलिसांनी यासंदर्भात सांगितले की, या निहंग शिखांनी तलवारींनी थापर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आळे आणि नंतर हल्लेखोर पळून गेले. त्यांच्यासोबत असलेल्या बंदुकधारी संरक्षकाने कोणताही प्रतिकार केला नाही किंवा हल्लेखोरांचा पाठलागही केला नाही. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत थापर यांना रुग्णालयात नेण्यात आले. शिवसेनेच्या नेत्यांनी नंतर रुग्णालयाला गराडा घातला. जमलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात तसेच आम आदमी पक्षाविरोधात घोषणाबाजी केली.

पंजाब शिवसेनेचे अध्यक्ष म्हणाले की, रवींद्र अरोरा यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते गेले होते. त्याचवेळी हा हल्ला झाला.

शिवसेनेच्या युवा शाखेचे प्रमुख सुमित अरोरा म्हणाले की, थापर यांना तीन सुरक्षा रक्षक पुरविण्यात आले होते पण आठवड्याभरापूर्वी ते सुरक्षा रक्षक कमी करण्यात आले. एक बंदुकधारी सुरक्षा रक्षक मात्र ठेवण्यात आला. त्या सुरक्षा रक्षकाने मात्र कोणताही प्रतिकार केला नाही. केवळ बघ्याच्या भूमिकेत तो होता. पोलिस पुढील तपास करत असून हल्लेखोरांचा शोध जारी आहे.

 

Exit mobile version