पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला झालेल्या अडथळ्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण असताना पंजाबच्या पोलिस महासंचालकांना हटविण्यात आले आहे. पंजाबचे पोलिस महासंचालक सिद्धार्थ चटोपाध्याय यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यामुळे पंजाब सरकारची या संपूर्ण घटनाक्रमात चूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. याआधी, फिरोजपूरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकाला निलंबित करण्यात आले होते.
शनिवारी झालेल्या महत्त्वाच्या घडामोडीत चटोपाध्याय यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्याजागी आता नवे पोलिस महासंचालक विरेश कुमार भवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यातील ही चौथ्या डीजीपीची नियुक्ती पंजाबात करण्यात आली आहे.
भवरा यांच्याप्रमाणेच दिनकर गुप्ता आणि प्रबोध कुमार यांच्या नावांचीही केंद्रीय लोकसेवा आयोगाने या पदासाठी शिफारस केली होती. १९८७च्या आयपीएस बॅचच्या भवरा यांना दोन वर्षांसाठी ही नियुक्ती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्या प्रयत्नातून चटोपाध्याय यांची नियुक्ती महासंचालक म्हणून करण्यात आल्याचे वृत्त होते. त्यातूनच त्यांच्यात आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणसिंग चन्नी यांच्यात संघर्ष सुरू होता. शेवटी चटोपाध्याय यांचीच नियुक्ती करण्यात आली. चटोपाध्याय यांच्याकडून झालेल्या या अक्षम्य चुकीमुळे सिद्धू यांच्या भूमिकाबद्दलही संशय व्यक्त होत आहे.
हे ही वाचा:
आशीष शेलारांना धमकी देणारा सापडला
गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना करणार महाविकास आघाडीचा प्रयोग
पाकिस्तानच्या सलीम मलिकची ती ऑफर ऐकून शेन वॉर्न हबकला!
पाकिस्तानला गेलेले ते ३ कॉल कोणाचे?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर इक्बाल प्रीत सिंग सहोता यांची डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पण त्यामुळे नवज्योत सिद्धू हे नाराज झाले आणि त्यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सहोता यांना १६ डिसेंबरला हटविण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री चन्नी यांनी चटोपाध्याय यांच्यासह १० आयपीएस अधिकाऱ्यांची यादी यूपीएससीकडे पाठविली. त्यानंतर चटोपाध्याय यांची नियुक्ती केली गेली. सध्या नियुक्त करण्यात आलेले भवरा हेदेखील सिद्धू यांच्या मर्जीतीलच आहेत.