पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आपला राजीनामा पाठवला.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, “माणसाच्या चारित्र्याचे पतन तडजोडीतून होते. पंजाबच्या भविष्याशी आणि पंजाबच्या कल्याणासाठीच्या अजेंड्याशी कधीही तडजोड करू शकत नाही. म्हणूनच, मी याद्वारे पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसची सेवा करत राहीन.” ते म्हणाले.
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) September 28, 2021
मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या नुकत्याच शपथ घेतलेल्या मंत्रिमंडळात सिद्धू यांना हवे असलेले आमदार न घेतल्यामुळे आणि पंजाबचे नवीन महाधिवक्ता अमर प्रीत सिंह देओल यांच्या नियुक्तीमुळे सिद्धू हे नाराज असल्याचे मानले जाते. .
देओल यांच्या नियुक्तीवरून झालेल्या गदारोळादरम्यान सिद्धू यांचा राजीनामा आला आहे. देओल, ज्यांनी त्यांच्या विविध उच्च-स्तरीय प्रकरणांमध्ये, पंजाबचे कलंकित माजी डीजीपी सुमेध सैनी यांचे प्रतिनिधित्व केले आहे त्यांना सोमवारी अधिकृत अधिसूचनेद्वारे नियुक्त केले गेले. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी या नियुक्तीच्या बाजूने म्हटले आहे की हे वादग्रस्त प्रकरण देओलच्या व्यावसायिक काळात होते.
सिद्धू यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. सिद्धू यांनी जूनमध्ये सुनील जाखड यांची जागा घेतली आणि त्यांच्यात आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यात जोरदार संघर्ष झाला. या महिन्याच्या सुरुवातीला अमरिंदर सिंग यांनी “अपमान” झाल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रिपद देण्यापूर्वी काँग्रेस नेतृत्व सिद्धू यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून सादर करण्याची तयारी करत होते.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?
योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
सिद्धू यांचा राजीनामा चन्नी यांच्या मंत्रिमंडळातील नवीन मंत्र्यांना विभाग दिल्यानंतर काही तासांनी आला आहे. “मी आधीच म्हणालो होतो, हा माणूस पंजाबचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी सक्षम नाही.” असं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले आहेत.
I told you so…he is not a stable man and not fit for the border state of punjab.
— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) September 28, 2021