पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचा पुतण्या ईडीच्या कचाट्यात

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचा पुतण्या ईडीच्या कचाट्यात

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. त्याला मोहाली येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अवैधरित्या वाळू उत्खनन प्रकरणी पैशांची अफरातफर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली आहे. पंजाबमधील अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर हनीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली आहे.

मोहालीतील अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी भूपिंदरसिंग हनी याच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले होते. अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या छाप्यांमध्ये भूपिंदरसिंग हनीच्या निवासास्थानातून तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे दहा कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हे ही वाचा:

‘सीमा वादात अमेरिकेने भारताच्या बाजूने म्हणजे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश’

महाराष्ट्राच्या चित्ररथाला पॉप्युलर चॉईस पुरस्कार

आयसिसच्या म्होरक्याचा खात्मा

सर्वोच्च न्यायालय म्हणते, मनी लॉन्ड्रिंगचा वापर दहशतीसाठीही केला जातो!

अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात असे समोर आले आहे की भूपिंदर सिंग, कुदरतदीप सिंग आणि संदीप कुमार हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत. अवैध वाळू उत्खनन रॅकेटच्या आसपास मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिघांची चौकशी केली जात आहे. बनावट कंपन्यांचा वापर करून पैसे उकळण्यासाठी आणि अवैध वाळू उत्खनन करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कंपनीची स्थापना ऑक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. सहा महिन्यांनंतर, कुदरतदीप सिंह यांच्याविरुद्ध अवैध वाळू उत्खनन प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. वाळूच्या खाणीचे कंत्राट मिळवण्यासाठी काळा पैसा गुंतवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

Exit mobile version