पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले नसते तरच नवल होते. ही भेट सुरक्षेच्या मुद्यावरून झाली असल्याचे सांगण्यात येत असले तरी देखील पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.
मंगळवार, १० ऑगस्ट रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे राजधानी दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर त्याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सोबतही सिंग यांची सुमारे तासभर बैठक झाली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाबचे नवनियुक्त काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातले शीतयुद्ध लपून राहिलेले नाही. पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब राज्याच्या निवडणुका काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत या दोन नेत्यांनी जुळवून घ्यावे आणि एकत्र काम करावे असे सोनिया गांधींनी सांगितल्याचे समजते.
हे ही वाचा:
आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?
भूमिपुत्रांवर बुलडोझर! मराठी टक्का टिकणार कसा?
पत्नीला गावावरून बोलवण्यासाठी त्याने मुलांनाच लावले पणाला!!
तर काँग्रेसमधील याच अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग आणि अमित शहा यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे भाजपाने पंजाब मधील आपला जुना मित्र पक्ष अकाली दल गमावला आहे. पंजाब मधील भाजपाचे संघटन हे तितकेसे मजबूत नाही तर नेतृत्व करणारा चांगला चेहराही भाजपाकडे नाही. अशावेळी इतर पक्षातील नेत्यांना स्वीकारून आपली ताकद वाढवण्याची राजकीय लवचिकता भाजपाने कायमच दाखवली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांचे अमित शहांना भेटणे हा काँग्रेस पक्षाला दिलेला कोणता इशारा तर नाही ना? अशी राजकीय कुजबूज सुरू झाली आहे.
पण राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून अमरिंदरसिंग हे अमित शहांना भेटल्याचे सांगण्यात येत आहे. १५ ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान मधील दहशतवादी गटांनी काही कुरबुऱ्या करू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात यावी. त्यासाठी पंजाबमध्ये सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स अर्थात सीएपीफच्या पंचवीस तुकड्या पाठविण्यात याव्यात तर त्या सोबत द्रोन विरोधी उपकरणेही पाठवली जावीत अशी मागणी सिंग यांनी अमित शहांकडे केली असल्याचे समजते.