सन २०२४मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी लढणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये ‘आप’चा समावेश न करण्याचे आवाहन पंजाब काँग्रेसने केले आहे. ‘आप’चा सहभाग आम्हाला मान्य नाही, असे स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे.
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग वारिंग यांनी ‘आप’वर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना ‘जबरदस्तीने तुरुंगात टाकण्यात आले’, असा आरोपही त्यांनी केले. ‘काँग्रेस पंजाबमध्ये ‘आप’च्या विरोधात अनेक मुद्द्यांवर लढत आहे. आमच्या नेत्यांना ज्या प्रकारे लक्ष्य करून तुरुंगात टाकण्यात आले, ते सहन करण्यापलीकडे आहे. आम्ही कधीही तक्रार केली नाही, पण आता त्यांनी आमचे नेते, माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना अटक केली आहे. ते आजारी असूनही त्यांना जबरदस्तीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांना काही झाले तर त्याला ‘आप’ जबाबदार असेल,’ असा इशारा अमरिंदर सिंग वारिंग यांनी दिला. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये कोणतीही युती होऊ शकत नाही, यावर ते ठाम होते.
हे ही वाचा:
तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…
श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण
शांतता राखा… मणिपूरमधील वेदनादायी घटनांनंतर आवाहन
मणिपूरमधील भयंकर व्हिडिओप्रकरणी चौघांना अटक
‘इंडिया’ या आघाडीबद्दल आमचे दुमत नाही. त्याबद्दल आक्षेप घेण्याचे काही कारणही नाही, परंतु ‘आप’चा समावेश आम्हाला मान्य नाही, असे काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी सांगितले. ‘आम्ही अध्यादेशाच्या मुद्द्यावरून भाजपला विरोध केला आहे. आम्ही कोणतीही राजकीय युती केलेली नाही आणि आम्ही ‘आप’शी असणाऱ्या कोणत्याही युतीच्या बाजूने नाही. आम्ही या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या विरोधात आहोत,’ असे प्रताप सिंह बाजवा म्हणाले.
पंजाबचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनीही काँग्रेसला तुम्ही राज्यातील सत्ताधारी पक्ष आहात की, विरोधी पक्ष, हे आधी स्पष्ट करा, अशी कुत्सित टिप्पणी केली. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी ‘इंडिया’ला ‘कठपुतळी शो’ म्हणत या आघाडीची निर्भत्सना केली. तर, काँग्रेस पक्षाला टोमणा मारताना, शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते विक्रम मजिठिया यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून प्रताप सिंग बाजवा यांची मान्यता रद्द करण्याची विनंती केली.