पुण्यातल्या व्यापाऱ्यांना दिलासा नाहीच

पुण्यातल्या व्यापाऱ्यांना दिलासा नाहीच

राज्यातील कोरोना रुग्णवाढीत घट होत असल्यामुळे राज्यात काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामध्ये दुकानांसाठी वेळमर्यादा देखील वाढवून देण्यात आली आहे. परंतु, रुग्णसंख्या कमी होऊन देखील पुणे शहराला दुकानांच्या वेळेत सूट दिलेली नसल्यामुळे चिडलेल्या दुकानदारांना आता प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुकी बिचारी कुणीही हाका अशी त्यांची स्थिती झाली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांत घट होत आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध काही जिल्ह्यांसाठी शिथिल करण्यात आले. यामध्ये पुण्याला मात्र कोणतीही सुट देण्यात आली नव्हती. दुकानांच्या वेळा ७ वाजेपर्यंत वाढवून देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. सुट न देण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी घंटानाद आंदोलन देखील केले. मात्र त्याचा परिणाम झालेला नाही, उलट या व्यापारांना आता प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

बुधवारपासून पुणे व्यापारी महासंघाने शहरातील सर्व दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी चारनंतर शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, बोहरी आळी, टिंबर मार्केट, कर्वे रस्ता, कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता आदी भागांतील दुकाने चारनंतरही उघडी ठेवण्यात आली. मात्र, तुळशीबाग, शनिपार चौक भागातील दुकाने दुपारी चारच्या सुमारास बंद करण्यात आली होती.

हे ही वाचा:

कोरोनाची लाट ओसरल्यामुळे नोकर’भरती’ला उधाण

तुम्ही आमच्या मुलींना हरवलंत, म्हणून आम्ही तुमच्या मुलांना हरवलं!

गणेशमूर्तिकांरांचे नुकसानच नुकसान

श्रीजेशची भिंत आणि भारताला हॉकीचे ऐतिहासिक ब्राँझ

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे दुकाने संध्याकाळी चारनंतर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारपासून संध्याकाळी चारनंतर दुकाने सुरू ठेवण्याचे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले. त्यानुसार बुधवारी शहराच्या मध्यभागातील आणि उपनगरांतील दुकाने संध्याकाळी चार नंतर सुरू ठेवण्यात आली होती.

मात्र त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सुरु असलेल्या दुकानांचे तपशील घेऊन त्यांचे फोटो काढले. तसंत दुकानदारांना दुकानं बंद करण्यासही सांगितलं. दुकानदारांनी आदेशाचं पालन न केल्यानं प्रशासनाने शहर आणि उपनगरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली. त्यामुळे कारवाई सुरु होताच संध्याकाळी सातच्या सुमारास पुण्यात सगळीकडे कडक बंद सुरु झाला.

Exit mobile version