नाशिक पोलिसांनंतर आता पुणे पोलिसांनीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांचे पथकही आता कोकणच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई होणार का? हा प्रश्न अधिक मोठा झाला आहे.
रायगड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल उद्गार काढले होते. मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा वर्धापनदिन माहीत नाही, यावरून कानशिलात लगावण्याचे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यावरून राणे यांच्यावर आधी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता पुण्यातही राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
राणेंच्या अटकेने काय पडसाद उमटतील, याचा विचार केलाय का?
शिवसेनेची तंतरली…‘त्या’ वक्तव्यावरून राणे यांना अटक करण्याचे आदेश
‘खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर येऊन दोन हात करा’
नाशिक मध्ये भाजपा कार्यालयावर दगडफेक
पण एवढ्यावरच न थांबता नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी नाशिक पोलिसांचे पथक हे कोकणच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर अली आहे. तर त्यानंतर आता पुणे पोलिसांचीही पथक कोकणच्या दिशेने रवाना झाले आहे.
पोलिसांच्या या कारवाई बद्दल भाजपाकडून आक्षेप नोंदवला जात आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई कायद्याला धरून नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी कायद्याला धरून वागावे असा सल्ला फडणवीसांनी पोलीस खात्याला दिला आहे. तर महाराष्ट्राचे सरकार हे पोलिसजीवी आहे असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.