राज्यातील २५ जिल्ह्यात राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुण्यात अद्यापही लेवल ३ चे निर्बंध लागू आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य पुणेकरांसह, व्यापारी आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार असल्याचं रांका यांनी स्पष्ट केलंय.
पुण्यात दुकानांसाठी सकाळी ७ ते दुपारी ४ ही वेळ देण्यात आली आहे. मात्र, व्यापारासाठी ही वेळ योग्य नाही. आम्हाला ७ ते ४ ऐवजी ११ ते ८ अशी वेळ देण्यात यावी. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असतानाही निर्णय घेतला जात नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार, अशी आक्रमक भूमिका फत्तेचंद रांका यांनी घेतली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात व्यापाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुपारी ४ पर्यंतची वेळ दिलेली असताना पुण्यातील व्यापारी संध्याकाळपर्यंत दुकानं सुरु ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा:
दरडग्रस्तांना मदत करण्यात ठाकरे सरकार अपयशी
एबी डिव्हिलियर्सवर वंशभेदाचा आरोप का झाला?
दरम्यान, पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. पुणे शहरात शिथिलता देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेकडे प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रस्ताव वाठवला आहे. पुढील कोरोना आढावा बैठकीत पुण्यातील शिथिलतेबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही काल पुण्यातील कोरोना निर्बंधांवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. ४ टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही कळत नाही? असा सवाल त्यांनी केला होता.