रविवार, २७ जून रोजी पुदुचेरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारोह पार पडला. यावेळी एकूण पाच जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली असून त्यामध्ये एका महिला मंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दशकात पहिल्यांदाच पुदुचेरी राज्यात एक महिला मंत्री असणार आहे.
केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या मंत्रिमंडळाला उपराज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन यांनी शपथ दिली आहे. मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या शपथविधीनंतर तब्बल ५० दिवसांनंतर हा मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आहे. पुदुचेरीच्या राज निवासात हा सोहळा पार पडला. यावेळी ए. नमशिवायम, के. लक्ष्मी नारायण, ए. के. साई जे सरवन कुमार, सी. डिज्याकुमार, चंद्रिका प्रियंगा या मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तर चंद्रिका प्रियंगा या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री असून त्या पुदुचेरीच्या इतिहासातील आजवरच्या पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत.
हे ही वाचा:
इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचा विषय
मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही
जपानमध्ये जे ‘झेन’ आहे, तेच भारतात ‘ध्यान’ आहे : पंतप्रधान मोदी
या मंत्रिमंडळात दोन मंत्री हे भारतीय जनता पार्टीचे असून एआयएनआरसी पक्षाचे तीन मंत्री आहेत. लक्ष्मीनारायणन, डीज्याकुमार आणि प्रियंगा हे एआयएनआरसी पक्षातर्फे मंत्री झाले आहेत. तर नमशिवायम आणि श्रवण कुमार या भाजपा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशात मोदी म्हणतात, “पुदुचेरी येथे शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांना शुभेच्छा. ही टीम दृढतेने कार्य करेल आणि पुदुचेरीच्या नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता करेल”
Best wishes to all those who took oath as Ministers in Puducherry today. May this team work with determination and fulfil the aspirations of the wonderful people of Puducherry.
— Narendra Modi (@narendramodi) June 27, 2021