मराठी भाषा, मराठी माणसं यांच्या बळावर सातत्याने राजकारण करत सत्तेत आलेल्या शिवसेनेला, सत्ता ग्रहणानंतर मात्र मराठीचा विसर पडला आहे. विविध उदाहरणांतून हे सातत्याने समोर येत गेले आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षक भर्तीच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
मुंबई महानगरपालिका शाळेत पवित्र पोर्टलवरून शिक्षक नियुक्ती केली जाते. यासाठी परीक्षा देखील घेतल्या जातात. मात्र, यातील धक्कादायक बाब म्हणजे इयत्ता दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या १५० शिक्षकांना मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात रुजू करण्याबाबत टाळाटाळ केली जात होती. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीत आला. या प्रस्तावावर झालेल्या चर्चेत महानगरपालिका प्रशासन विशिष्ट हट्टापायी मराठीला बाजूला सारून इंग्रजी भाषेला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे शिक्षण समिती सदस्य प्रतीक करपे यांनी केला. यातून सत्ताधाऱ्यांच्या मराठी प्रेमाचा बुरखा फाटल्याची टीका श्री. करपे यांनी शिक्षण समितीत केली.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी नार्को टेस्ट करावी; भाजपा आमदाराची मागणी
कंगना रानौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ
महाराष्ट्र शासन पवित्र पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे इंग्रजी शाळेत त्यांची नेमणूक करता येणार नाही असे शिक्षण विभागाने सांगितले होते. महत्त्वाची बाब म्हणजे या उमेदवारांचे शालेय शिक्षण वगळता इतर शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. असे असतानाही, त्यांना शिक्षण विभागातील सेवेत तात्काळ रुजू न करून घेणे हा मराठी भाषेवर अन्याय आहे. आधीच मराठी शाळांतील पटसंख्या कमी होत आहे. अशाप्रकारे राज्यकर्त्यांना मराठीचा विसर पडल्यास पालक मराठी शाळांमध्ये मुले पाठवणार नाहीत, असे मत शिक्षण समिती सदस्य श्री. करपे यांनी व्यक्त केले.
राज्याची मातृभाषा मराठी असताना नेमके राज्यात तसेच मुंबईत राज्यकर्ते कोण आहेत? असा प्रश्न देखील श्री. करपे यांनी उपस्थित केला. मुंबईतील मराठी भाषेच्या अधोगतीला उथळ मराठी प्रेम असलेली शिवसेना जबाबदार आहे. बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांना ‘आमचे मराठीवर प्रेम आहे’ याचा खुलासा करताना नाकीनऊ आले होते. यावरून सत्ताधार्यांच्या मराठी प्रेमाचा कळवळा खोटा असल्याची कठोर टीका श्री. करपे यांनी केली. दहावी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावे अन्यथा याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात येईल असा इशारा श्री. करपे यांनी यावेळी दिला.